नवी दिल्ली – जागतिक बाजारात सोन्याचे दर कमी होत आहेत. त्याचबरोबर अर्थसंकल्पामध्ये आयात शुल्कात घट केल्यामुळे गेल्या तीन दिवसांपासून सोन्याच्या दरात घट चालू आहे.
या कारणामुळे बुधवारी सोने आणि चांदीचे दर कोसळले. दिल्ली सराफात सोन्याचा दर 232 रुपयांनी कमी होऊन 47,387 अंकांवर बंद झाला तर चांदीचा दर 1,955 रुपयांनी कमी होऊन 67,605 रुपये प्रति किलो या पातळीवर गेला.
जागतिक बाजारात सोन्याचे दर कमी होऊन 1,835 रुपये डॉलर प्रति औंस तर चांदीचा दर 26.78 डॉलर प्रति औंस झाला. अमेरिकेने जाहीर केलेले पॅकेज प्रत्यक्षात अंमलात येण्यास उशीर होत आहे. त्याचबरोबर लसीकरणाला बराच काळ लागत असल्यामुळे गुंतवणूकदार सोने आणि चांदीतील नफा काढून घेत असल्यामुळे सोन्याचे दर कमी होत असल्याचे सांगितले जाते.
भारतात सोन्यावर साडेबारा टक्के एवढे सीमाशुल्क होते. त्यामुळे स्मगलिंग आणि इतर गैरप्रकार होत होते. ते कमी करण्यासाठी भारताने सोन्यावरील आयात शुल्क 5 टक्क्यांनी कमी केले आहे. मात्र भारतात सोन्यावर कृषी पायाभूत सुविधासाठी अडीच टक्क्यांचा अधिभार लावला आहे.
त्यामुळे सोन्यावर एकूण 10 टक्के एवढे शुल्क पडते. मात्र पूर्वीच्या शुल्काच्या प्रमाणात घट झाल्यामुळे भारतात सोने स्वस्त होत आहे. सोन्याचे दर 50 हजार रुपयांपेक्षा कमी पातळीवर असल्यावर सोने खरेदी केल्यास दीर्घ पल्ल्यात नफा होऊ शकतो, असे बरेच विश्लेषक सुचवीत आहेत.