नवी दिल्ली- जागतिक वायदे बाजारात सोन्याच्या दरात घट झाल्यानंतर भारतातही सोने आणि चांदीच्या दरात घट नोंदली गेली. दिल्ली सराफात सोन्याचे दर 263 रुपयांनी कमी होऊन 48,861 रुपये प्रति 10 ग्रॅम व चांदीचे दर 806 रुपयांनी कमी होऊन 66,032 रुपये प्रती किलो या पातळीवर गेले.
गेल्या तीन दिवसापासून सोन्याचे दर एकतर्फी वाढत होते. एचडीएफसी सिक्युरिटीज वरिष्ठ विश्लेषक तपन पटेल यांनी सांगितले की, जागतिक वायदेबाजाराबरोबरच भारतीय वायदे बाजारातही सोन्याचे दर कमी झाल्यामुळे स्पॉट मार्केटमध्ये सोन्याचे दर कमी झाले.
जागतिक बाजारात सोन्याचे दर कमी होऊन 1,861 डॉलर प्रति औंस तर चांदीचे दर 25.52 डॉलर प्रती औंस झाले. सोन्याचे दर 50 हजार रुपयापेक्षा कमी असल्यानंतर दिर्घ पल्ल्यातील गुंतवणूकदारांसाठी ही खरेदी फायदेशीर ठरू शकते असे बऱ्याच विश्लेषकांना वाटते.
जागतिक अर्थव्यवस्था अजूनही पूर्ववत झाली नसल्यामुळे काही प्रमाणात गुंतवणूकदार सोन्याचा आधार घेत असल्याचे वातावरण आहेत.