पेठ परिसरात हिंदू-मुस्लिम ऐक्याचे दर्शन
पेठ- परिसरामध्ये हिंदू-मुस्लिम समाज गुण्यागोविंदाने एकत्र राहत आहे. श्रावण सोमवार हिंदू समाजासाठी पवित्र समजला जातो. त्यामुळे मुस्लिम बांधवानीं बकरी ईदची कुर्बानी दुसऱ्या दिवशी म्हणजे मंगळवारी (दि. 13) देण्याचा निर्णय घेऊन हिंदू-मुस्लिम ऐक्याचे प्रदर्शन घडवले आहे.
पेठमधील मुस्लिम समाजातील बहुसंख्य बांधवांनी आज श्रावणी सोमवार असल्याने बकरी ईदच्या दिवशी होणारी कुर्बानी न देण्याचा एकमुखाने निर्णय घेतला. श्रावण महिना आणि त्यातही दुसरा श्रावणी सोमवार असल्यामुळे हिंदू बांधवाच्या भावनांची कदर करीत मुस्लिम बांधवांनी हा निर्णय घेतला. हिंदू-मुस्लिम ऐक्य आणखी घट्ट करण्यासाठी मुस्लिम बांधवांनी घेतलेल्या निर्णयाचे परिसरातील नागरिकांनी कौतुक केले आहे. हा निर्णय घेण्यासाठी मुस्लिम समाजाचे नेते इस्माईल याकुबभाई तांबोळी यांनी पुढाकार घेतला.