भाजपच्या आमदाराने घेतली राज ठाकरेंची भेट, चर्चेचा तपशील मात्र गुलदस्त्यात

मुंबई – भारतीय जनता पक्षाचे आमदार प्रसाद लाड यांनी मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांची त्यांच्या कृष्णकुंज या निवासस्थानी जाऊन भेट घेतली आहे. या भेटीसंदर्भातील वृत्त एएनआय या वृत्त संस्थेने दिलं आहे. मात्र, या भेटीत नेमकी काय चर्चा झाली, हे मात्र गुलदस्त्यातच आहे. या भेटीत नेमकी काय चर्चा झाली हे अद्याप स्पष्ट झाले नसल्यामुळे राजकीय चर्चेला पुन्हा उधाण आलं आहे.

प्रसाद लाड हे विधान परिषदेचे आमदार असून मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचे विश्वासू समजले जातात. राज ठाकरे हे गेल्या पाच वर्षांपासून भाजपवर सातत्याने जोरदार हल्लाबोल करताहेत.लोकसभा निवडणूकी दरम्यान सुध्दा राज ठाकरे यांनी मोदी-शहा जोडीविरोधात प्रचाराचा धडाका लावला होता. त्यामुळे या भेटीला महत्त्व प्राप्त झालंय.

दरम्यान, मुंबईत 9 ऑगस्टला झालेल्या मेळाव्यात राज ठाकरे यांनी भाजपवर टीकास्त्र सोडले होते. तसेच पूरपरिस्थितीवरून देखील भाजप सरकारवर टीका केली होती. पूरस्थिती पाहता विधानसभा निवडणूक पुढे ढकला, अशी मागणी देखील त्यांनी केली होती. तसेच ईव्हीएम ऐवजी बॅलेटपेपरने निवडणुका घ्याव्यात अशी राज यांची मागणी आहे.  काहीच दिवसापूर्वी निवडणुकांमध्ये वापरण्यात येत असलेल्या ईव्हीएम मशिनसंदर्भात राज ठाकरे यांनी पश्चिम बंगालच्या मुख्यमंत्री ममता बॅनर्जी यांची भेट घेतली होती.

Leave A Reply

Your email address will not be published.