पणजी – कॉंग्रेसच्या नेतृत्वाखालील आघाडी गोवा विधानसभा निवडणुकीत बाजी मारेल. निवडणूक निकालानंतर अवघ्या अर्ध्या तासात कॉंग्रेस मुख्यमंत्र्यांची निवड करेल, अशा शब्दांत कॉंग्रेस प्रदेशाध्यक्ष गिरीष चोडणकर यांनी बुधवारी स्वपक्षाच्या विजयाबद्दल खात्री व्यक्त केली.
गोवा विधानसभा निवडणुकीचा निकाल 10 मार्चला जाहीर होईल. त्यापार्श्वभूमीवर, पीटीआय वृत्तसंस्थेला दिलेल्या मुलाखतीवेळी चोडणकर यांनी त्या राज्यात सत्ताबदलाचे भाकीत केले. विधानसभेच्या एकूण 40 पैकी 24 ते 26 जागा कॉंग्रेसच्या नेतृत्वाखालील आघाडीला मिळतील.
निकाल जाहीर झाल्यानंतर मित्रपक्षांना विश्वासात घेऊन कॉंग्रेस मुख्यमंत्री ठरवेल. मुख्यमंत्र्यांची निवड करण्याचा अधिकार नवनिर्वाचित आमदारांचा आहे. त्यामुळे मी कुणाचे नाव उघड करणार नाही.
मात्र, मुख्यमंत्रिपदासाठी कॉंग्रेसची पसंती कुणाला आहे ते संपूर्ण गोव्याला ठाऊक आहे, असे त्यांनी म्हटले. गोव्यात कॉंग्रेसला सत्ता मिळाल्यास ज्येष्ठ नेते दिगंबर कामत हे मुख्यमंत्रिपदाचे प्रबळ दावेदार मानले जातात. गोव्यात सध्या भाजपची सत्ता आहे. त्या राज्यात विधानसभा निवडणुकीसाठी 14 फेब्रुवारीला मतदान झाले. आता उत्तरप्रदेश, उत्तराखंड, पंजाब, मणिपूर आणि गोव्यातील निकाल एकाच दिवशी जाहीर होतील.