पणजी – दिवंगत मनोहर पर्रिकर यांचे चिरंजीव उत्पल पर्रिकर यांनी अपक्ष निवडणूक लढवण्याची तयारी दर्शवली तर शिवसेना त्यांना पाठिंबा देईल असे आश्वासन त्या पक्षाकडून देण्यात आले होते. हे आश्वासन शिवसेनेने पाळले असून त्यांनी पणजी मतदार संघातील आपले उमेदवार शैलेंद्र वेलींगकर यांची उमेदवारी मागे घेऊन त्यांनी उत्पल पर्रिकर यांना पाठिंबा घोषित केला आहे.
अन्यही राजकीय पक्षांनी भाजपच्या विरोधात उत्पल पर्रिकर यांच्या उमेदवारीला पाठिंबा द्यावा असे आवाहन शिवसेनेच्यावतीने करण्यात आले आहे. गोव्याच्या राजकारण शुद्धीसाठीही आम्ही हा निर्णय घेतला आहे असे शिवसेनेचे नेते संजय राऊत यांनी म्हटले आहे. मनोहर पर्रिकरांच्या मतदार संघात भाजपने बाबुश मॉन्सेरात या गुन्हेगार उमेदवाराला उमेदवारी दिल्याने आपण अपक्ष उमेदवार म्हणून निवडणूक लढवण्याचा निर्णय घेतला आहे असे उत्पल पर्रिकर यांनी या आधीच स्पष्ट केले आहे.