मंचर -विनाकारण दुचाकी गाडीवर फिरणाऱ्यांवर मंचर पोलिसांनी कारवाई न करता बुधवारी (दि. 22) समज दिली. गुरुवारपासून दुचाकी आणि चारचाकी वाहनांवर कडक कारवाई करणार असल्याचे पोलीस निरीक्षक कृष्णदेव खराडे यांनी सांगितले.
पुणे-नाशिक हमरस्त्यावर मंचर बसस्थानकानजीक असणारी पोलीस चौकी, पिंपळगाव फाटा येथे पोलिसांनी चेक पोस्ट उभारले. तेथून येणाऱ्या जाणाऱ्या दुचाकी, चारचाकी चालकांना समज देण्यात आली.
डबलसीट दिसणाऱ्यांना पोलीस निरीक्षक कृष्णदेव खराडे यांनी “बाबांनो कशाला बाहेर फिरता, स्वतःची काळजी घ्या, कुटुंबांची काळजी घ्या.’ असे हात जोडून ते वाहनचालकांशी संवाद साधत होते. तसेच मास्क न लावणाऱ्या वाहनचालकांना दंड करण्यात आला.
गुरूवारपासून वाहनचालकांवर कडक कारवाई करण्याचे त्यांनी संकेत दिले. अत्यावश्यक कामासाठी बाहेर पडताना सोबत गाडीची कागदपत्रे, वाहन चालविण्याचा परवाना, तोंडावर मास्क नसल्यास कडक कारवाई केली जाईल. गाड्या जप्त केल्या जातील. सहायक पोलीस निरीक्षक, उपनिरीक्षक, 30 पोलीस जवानांनी कारवाईत भाग घेतला.