पुणे – करोनामुळे प्रकृती गंभीर झालेल्या रुग्णांना दिल्या जाणाऱ्या “रेमडीसिविर’ आणि “टोसीझुलोम्याब’ या इंजेक्शनची घाऊक बाजारातील किंमत आणि “एमआरपी’मध्ये (किरकोळ बाजारातील किंमत) तीन ते चार पटीने तफावत आहे. ही औषधेही गरजू रुग्णांना मोफत उपलब्ध करून द्यावीत, अशी मागणी वैद्यकीय क्षेत्रातून होत आहे.
“रेमडीसिविर’ हे इंजेक्शन 2800 रुपये, 5400 रुपये आणि 4500 रुपये 4700 रुपये अशा वेगवेगळ्या “एमआरपी’मध्ये उपलब्ध आहे. रुग्णाला पहिल्या दिवशी 2 नंतर पुढील 3 दिवस असे 5 डोस देण्यात येतात. यामुळे साधारण 14 ते 27 हजार रुपयांपर्यंत खर्च येतो, असे असताना हे इंजेक्शन उत्पादित कंपन्या घाऊक औषध विक्रेत्यांना 875 ते 950 रुपयांपर्यंत देतात.
टोसीझुलोम्याब इंजेक्शनची एमआरपी 40 हजार 545 रुपये आहे. उत्पादक कंपन्या घाऊक व्यापाऱ्यांना ते 29 हजार 600 रुपयांना देतात. हे औषध करोनावर लागू पडत नाही. तरीही या औषधाची मागणी डॉक्टरांकडून होत आहे. एका रुग्णांना दोन इंजेक्शन द्यावी लागतात.