पुणे- महामेट्रो तर्फे तयार करण्यात येणाऱ्या हब मध्ये जे व्यावसायिक संकुल उभारण्यात येणार आहे त्याच्या वार्षिक उत्पन्नाच्या 50 टक्के हिस्सा आम्हाला द्या, अशी मागणी महापालिकेने “महामेट्रो’कडे पत्राद्वारे केली आहे.
महापालिकेने शहरातील विविध ठिकाणी “महामेट्रो’ला मेट्रो स्टेशनसाठी जागा दिल्या आहेत. त्यापैकी तीन ठिकाणी मोक्याच्या जागेत महामेट्रोचा “मल्टी मॉडेल हब’ करून त्यात व्यावसायिक संकुल उभारणार आहे. यासर्व ठिकाणच्या व्यावसायिक संकुल मधून येणाऱ्या उत्पन्नाच्या 50 टक्के हिस्सा महापालिकेला देण्यात यावा, असे या पत्रात म्हटले आहे.
महापालिकेने स्वारगेट येथील 28 हजार चौरस मीटर क्षेत्रात महामेट्रोला मेट्रो स्टेशन करण्यासाठी रेडीरेकनर दराने जागा दिली आहे. परंतु, हे स्टेशन उभारत असताना येथे मल्टी मॉडेल हब व्यावसायिक संकुल देखील महामेट्रो करत आहे. सदर जागेचा वापर या प्रकारे होऊन “महामेट्रो’ नफा मिळवत असेल तर यातून होणाऱ्या वार्षिक उत्पन्नातून 50 टक्के हिस्सा महामेट्रोने पुणे महापालिकेला द्यावा, असे महापालिकेचे म्हणणे आहे.
महापालिकेने महामेट्रोला दिलेल्या क्षेत्राचे ताबे पावती केलेली आहे. परंतु, करारनामा झालेला नाही. तो करताना सदर जागेचा व्यावसायिक हेतूने वापर केल्यास होणाऱ्या वार्षिक नफ्यातून 40 ते 50 टक्के हिस्सा महानगरपालिकेला मिळावा, अशी अट घालण्यात यावी किंवा 40 ते 50 टक्के पार्टनरशिप करावी तसेच स्थायी समिती मार्फत मुख्य सभेत मान्यता घेऊनच करार करावा, अशी मागणी काही सदस्यांनी केली आहे.