पुणे – …अखेर “त्या’ हॉटेलवर पडणार हातोडा

स्वारगेट चौकातील प्रश्‍न : मेट्रो प्रकल्पासाठी जागा रिकामी करून देणार

पुणे – स्वारगेट चौकातील जिजाऊ हॉटेलवर तीन ते चार दिवसांतच हातोडा पडणार असून, ही जागा मेट्रोसाठी मोकळी करून देण्यात येणार आहे.

स्वारगेट येथे मेट्रो हबसाठी तेथील स्टॉलधारकांना सणस ग्राऊंडजवळ आणि मित्रमंडळ चौकातील पाटील प्लाझा येथील फुटपाथवर स्थलांतरीत करण्यात आले आहे. मात्र, अद्याप या हॉटेलवर कारवाई करण्यात आली नव्हती. मात्र, आता दोन-चार दिवसांतच हे हॉटेल हलवण्यात येणार आहे.

ही महापालिकेच्या मालकीची जागा असून, येथे आधी आरोग्य कोठी होती. वास्तविक महिला बचत गटासाठी ही जागा एका माजी नगरसेविकेने ताब्यात घेतली होती. त्यानंतर तेथे महिला बचत गटाच्या उत्पादनांची विक्री करण्यात येत होती. तेथे एक हॉटेलही चालवले जात होते. आता ते काढून ही जागा मेट्रोसाठी खुली करून दिली जाणार आहे.

महिला बचत गटांचा विषय असल्याने महापालिकेच्या समाज विकास विभागाकडे या जागेबाबतचा निर्णय होता. मात्र, त्याबाबतची प्रक्रिया पूर्ण करून तीन दिवसांतच ही जागा मेट्रोच्या ताब्यात दिली जाणार आहे. त्यानंतर हे पाडून मेट्रो तेथे विकसन करणार आहे.

…तोपर्यंत येथेच स्थलांतरण
स्वारगेट येथील स्टॉलधारकांना पाटील प्लाझा येथे स्थलांतर केल्याने पाटील प्लाझा येथील दुकानदारांनी त्याला विरोध केला आहे. त्यांनी त्यासाठी रास्ता रोको केले होते. तसेच हा रस्ता नो-हॉकर्स झोन असल्याने येथे स्थलांतर होऊ शकत नाही, असा युक्तिवाद पाटील प्लाझा येथील दुकानदारांचा आहे. याशिवाय या दुकानदारांनी महापौर आणि महापालिका आयुक्त यांनाही निवेदन दिले आहे. मात्र, या गाळेधारकांचे महापालिकेच्या कोणत्याही स्कीममध्ये जोपर्यंत पुनर्वसन होत नाही तोपर्यंत त्यांना येथेच स्थलांतरित करण्यात येणार असल्याचे, महापालिकेच्या अतिक्रमण नियंत्रण विभागाचे प्रमुख माधव जगताप यांनी याबद्दल सांगितले.

Leave A Reply

Your email address will not be published.