पुणे – सुरू होण्याआधीपासूनच नकारात्मकतेचे शुक्लकाष्ठ मागे लागलेल्या सीओईपीच्या मैदानावरील जम्बो कोविड सेंटर अखेर पुढील आठवड्यात पूर्ण क्षमतेने सुरू होणार आहे. महापालिकेतील अतिरिक्त आयुक्त रुबल अग्रवाल यांनी याविषयी माहिती दिली. हे हॉस्पिटल सुरू होऊन एक महिना उलटला आहे. सुरुवातीचा गोंधळ सोडला तर 15 दिवसांत हे हॉस्पिटल सुरू करण्याचा वेग कौतुकास्पद आहे.शिवाजीनगर येथील जम्बो रुग्णालयात करोनाबाधितांवर उपचार करण्यासाठी 400 बेड कार्यान्वित करण्यात आले असून, उर्वरित 400 बेड पुढील आठवडाभरात टप्प्याटप्प्याने सुरू करण्यात येणार आहे. पुणे महानगर प्रदेश विकास प्राधिकरणाने (पीएमआरडीए) संबंधित एजन्सीला पुढील 400 बेडच्या तयारीची प्रक्रिया सुरू करण्याचे आदेश दिल्यानंतर या ठिकाणी रुग्णांवरील उपचारांना सुरूवात होणार असल्याचे अग्रवाल म्हणाल्या.
जम्बो रुग्णालयात सध्या 400 रुग्णांवर उपचार करण्यात येतात. याशिवाय दहा डायलिसिस मशीनही येथे दाखल झाले आहेत. त्यामुळे जे आधीपासूनच डायलिसिसवर आहेत आणि त्यातून त्यांना करोनाचा बाधा झाली आहे, अशा रुग्णांवर येथे उपचार करण्यात येतील असे अग्रवाल यांनी नमूद केले.
याशिवाय जम्बोमध्ये “सिटीस्कॅन’ची व्यवस्था करण्याचेही आदेश देण्यात आले असून, त्याचीही यंत्रणा येथे लवकरच कार्यान्वित होणार आहे. यामुळे करोनाव्यतिरिक्त इतर आजार असणाऱ्या रुग्णांवरही उपचार करता येणार आहे, अशी माहिती महापालिका आयुक्त विक्रम कुमार यांनी दिली.
…अतिरिक्त रुग्णांसाठही नियोजन
जम्बो सुरू करताना येथे ऑक्सिजनचे 600 बेड तर आयसीयु मध्ये 200 बेड असे निश्चित करण्यात आले होते. त्यानुसार 400 बेड सद्यस्थितीत रुग्णांवर उपचार करण्यासाठी सज्ज असून, त्यासाठी आवश्यक मनुष्यबळही येथे तैनात करण्यात आले होते. त्यामुळे आता अतिरिक्त 400 रुग्णांवर येथे उपचार करण्यासाठी नियोजन करण्यात आले असून “पीएमआरडीए’ने संबंधित एजन्सीला कार्यादेश दिल्यानंतर येथे अतिरिक्त रुग्ण घेण्यासही सुरूवात करण्यात येणार आहे.