लोणी काळभोर – महावितरणच्या सर्व कायम कामगारांना आगामी काळातील सणांच्या पार्श्वभूमीवर 30 हजार रुपये सानुग्रह अनुदान देऊन प्रलंबित असलेली 40 टक्के पगारवाढ देऊन भत्त्यांमध्येही भरघोस वाढ करावी. असे निवेदन महावितरणचे अध्यक्ष व मुख्य व्यवस्थापकीय संचालक लोकेश चंद्र यांना महाराष्ट्र राज्य तांत्रिक कामगार संघटनेच्या वतीने दिल्याचे केंद्रीय उपाध्यक्ष बाळासाहेब सायकर यांनी सांगितले.
सायकर म्हणाले, महाराष्ट्र राज्य तांत्रिक कामगार संघटनेचे सरचिटणीस सय्यद जहिरोद्दीन यांनी हे निवेदन दिले आहे. पगारवाढीसह अन्य मागण्यांवर लवकरच मुख्यालयात चर्चेचे आयोजन करण्याचे लोकेश चंद्र यांनी तांत्रिक कामगार संघटनेस आश्वासन दिले आहे. या निवेदनानुसार कामगारांना 2021-22 मध्ये दिवाळीनिमित्त 16,500 रुपये सानुग्रह अनुदान देण्यात आले होते. यावर्षी वीज तांत्रिक कामगार, अधिकारी अभियंते, यांच्यासह सर्व सहायकांना किमान 30 हजार सानुग्रह अनुदान द्या. वीज कंपन्यांमध्ये कार्यरत सर्व बाह्यस्त्रोत कामगारांना ठेकेदारांमार्फत सन्मानजनक सानुग्रह अनुदान देण्याची मागणी निवेदनात करण्यात आली आहे.
वीज कामगारांचा 2023 ते 2028 पगारवाढ करार प्रलंबीत आहे, मागील दि. 1 एप्रिल 2018 ते 31 मार्च 2023 या पगारवाढ करारामध्ये 25 टक्के पगारवाढ आणि सर्व भत्त्यांमध्ये 100 टक्के वाढ देण्यात आली होती. मागील 5 वर्षांच्या कालावधीत महागाई प्रचंड प्रमाणात वाढली असून तीनही कंपन्या फायद्यात आहेत. त्यामुळे संघटनेने सादर केलेल्या पगारवाढ प्रस्तावामध्ये वीज तांत्रिक कामगारांना 40 टक्के पगारवाढ आणि सर्व भत्त्यांमध्ये 300 टक्के वाढ देण्याची मागणी करण्यात आली आहे.
यावेळी महावितरणचे संचालक संचलन संजय ताकसांडे, सहव्यवस्थापकीय संचालक प्रकाश खपले, मुख्य अभियंते डॉ मुरहरी केळे, अविनाश निंबाळकर, भूजंग खंदारे, संघटनेचे सरचिटणीस सय्यद जहिरोद्दीन, उपसरचिटणीस कैलास गौरकर, उपाध्यक्ष ताराचंद कोल्हे, प्रादेशिक सचिव एस पी शाहीर, सचिव भानूदास शेवाळे, विभागीय अध्यक्ष शेख रफिक, विभागीय सचिव विश्वंभर लोखंडे, संघटन सचिव दीपक थट्टेकर, पदाधिकारी मच्छिंद्र लग्गड, राजेश ढोणे, निलेश लोखंडे, विशाल घायाळ, गोविंद पाटील आदी उपस्थित होते.
या आहेत मागण्या
संघटनेच्या वतीने मराठवाड्यात महावितरण कंपनीमध्ये कार्यरत असलेल्या यंत्रचालकांना तिमाही फक्त 75 तास मिळणारा अतिरिक्त कामाचा मोबदला (ओव्हरटाइम) 2017 पासून बंद करण्यात आला आहे. तो सुरू करण्यात यावा, लाईनस्टाफ तांत्रिक कामगारांना फक्त 5 लिटर पेट्रोल भत्ता देण्यात येतो. तो दरमहा 13 लिटर देण्यात यावा. तांत्रिक कामगारांना अन्य तांत्रिक कामगाराची जबाबदारी दिल्यानंतर त्यास नियमाप्रमाणे भत्ता देण्यात यावा. तांत्रिक कामगारांच्या कामाचे मूल्यांकन करून त्यांच्या कामाचे 8 तास निश्चित करण्यात यावे.
तांत्रिक कामगारांच्या बदल्यांमध्ये अन्याय झालेला आहे, तसेच तांत्रिक कामगारांच्या बदल्या ऑनलाइन प्रणालीमधून करण्यात याव्यात. मराठवाड्यास महावितरण कंपनीमध्ये पायाभूत सुविधांमध्ये सुधारणा करण्यात याव्यात जेणे करून वीज ग्राहकांना अखंडीत वीज पुरवठा देणे सोपे होईल. जालना येथे महानगर पालिका अस्तित्वात आल्यामुळे त्या ठिकाणी अनुकंपाधारकांना विनाअट प्रत्येक शाखेत कार्यालयीन सहायक देण्यात यावा.