पौड – मुळापूर (ता. मुळशी) येथे एका तरूणीस लग्नाचे आश्वासन देऊन ऐनवेळी परस्पर दुसऱ्या मुलीशी टिळा केल्याने संबंधित तरूणीने गळफास घेऊन आत्महत्या केल्याची घटना घडली आहे.
प्रियंका बाळासाहेब गायकवाड (वय 18) असे आत्महत्या केलेल्या तरूणीचे नाव असून, याप्रकरणी प्रदीप बाळासाहेब गायकवाड (वय 23, रा. मुळापूर पोमगाव, ता. मुळशी) यांनी पौड पोलीस ठाण्यात फिर्याद दाखल केली आहे. तर गोरख किसन बोडके असे संशयित तरुणाचे नाव आहे.
पौड पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, प्रियंका ही गेली तीन वर्षे उत्तमनगर पुणे येथे ब्युटी पार्लरच्या क्लासनिमित्त तिच्या नातेवाईक यांच्याकडे राहत होती. लॉकडाउन काळात प्रियंका गावी आली असताना शेजारी राहणारा गोरख बोडके हा नेहमी घरी येत असत. या दरम्यान दोघांची जवळीक वाढली. दोघांनी लग्न करायचे ठरवून प्रियंका तू तुझ्या घरच्यांना तयार कर, मी माझ्या घरच्यांना तयार करतो असे चॅटिंग गोरखने प्रियंकाला केले होते.
तो लग्नासाठी तिच्यावर दबाव आणायचा. त्याच्या भीतीने ती कोणालाही काही सांगत नव्हती. ती नेहमी मानसिक तणावाखाली वावरत होती; मात्र नुकतेच गोरखचे लग्न ठरवून टिळा झाला असल्याचे प्रियंकाला समजले. गोरख याने प्रियंकाचा मानसिक छळ करून जगण असह्य केले होते. याच गोष्टीचे टेन्शन घेऊन प्रियंका हिने मुळापूर येथे घराच्या मागे असलेल्या बाथरूमच्या अँगलला ओढणीने गळफास घेऊन आत्महत्या केली.
पौड येथील ग्रामीण रूग्णालयात शवविच्छेदन झाल्यानंतर मृतदेह नातेवाइकाच्या ताब्यात देण्यात आला. घटनेचा पुढील तपास पोलीस निरीक्षक अशोक धुमाळ यांच्या मार्गदर्शनाखाली उपनिरीक्षक मृगदीप गायकवाड आणि सहायक उपनिरीक्षक सचिन शिंदे हे करीत आहेत.