बार्सिलोना – युरोप लीग स्पर्धेत बलाढ्य संघ असलेल्या बार्सिलोनाला उपांत्यपूर्व फेरीत पराभवाचा सामना करावा लागल्याने त्यांचे आव्हान संपुष्टात आले आहे. जर्मन संघ आइन्ट्रॅक फ्रॅंकफर्टने दोन टप्प्यांतील सामन्यांत बार्सिलोनाला एकूण 4-3 असा विजय मिळवित उपांत्य फेरीत प्रवेश केला.
या लढतीचा पहिल्या टप्प्यातील सामना 1-1 असा बरोबरीत सुटला होता. तर बार्सिलोनाच्या घरच्या मैदानावर झालेल्या दुसऱ्या टप्प्यातील सामन्यात यजमानांचे पारडे जड मानले जात होते. मात्र, बार्सिलोनाला या सामन्यात 2-3 असा पराभव पत्करावा लागला. फ्रॅंकफर्टकडून फिलिपे कॉस्टिचने (चौथे आणि 67 वे मिनिट) दोन, तर राफाएल सॅंटोस बोरेने (36वे मि.) एक गोल केला. बार्सिलोनाकडून सर्जिओ बुस्केट्स आणि मेंफिस डिपे यांनी 90 मिनिटांनंतरच्या भरपाई वेळेत गोल केले. मात्र, बार्सिलोनाला आगेकूच करण्यासाठी ते अपुरे ठरले.