पुणे -महा पालिके च्या कात्रज येथील स्वर्गीय राजीव गांधी प्राणी संग्रहालयात लवकरच पुणेकरांना “जिराफ’ पहायला मिळणार आहे. त्यासाठी खंदक तयार करण्याचे काम महापालिकेकडून हाती घेण्यात आले असून हे काम पूर्ण होत असतानाच; जिराफ मागविण्यासाठी केंद्रीय प्राणी संग्रहालय प्राधिकरणास प्रस्ताव पाठविण्यात येणार असल्याची माहिती प्रशासकीय सुत्रांकडून दिली.
प्राणी संग्रहालयात सध्या सुमारे 7 कोटी रुपये खर्चून वेगवेगळे खंदक उभारण्यात येत असून त्यात निलगाय तसेच जिराफाच्या खंदकासह इतर प्राण्यांच्या खंदकाचे काम सुरू आहे. महापालिकेच्या कात्रज येथील प्राणी संग्रहालयात सर्पोद्यानासह प्राणी संग्रहालय असून तीनशेंहून अधिक वेगवेगळ्या जातीचे प्राणी आहेत.
तर महापालिकेकडून दरवर्षी त्यात, नवीन प्राण्यांची भर घालण्यात येत आहे. काही दिवसांपूर्वी पालिकेने औरंगाबाद येथून वाघ आणण्यात आले असून त्यापूर्वी अशियायी सिंह, कोल्हा आणण्यात आला आहे. त्यानंतर आता महापालिकेकडून जिराफ आणण्याची तयारी सुरू करण्यात आली आहे.
प्राणी संग्रहालय उघडण्याची प्रतीक्षा
महापालिकेच्या उद्यान विभागास सर्वाधिक उत्पन्न मिळवून देणारे हे प्राणीसंग्रहालय असून गेल्या दीड वर्षांपासून करोना संकटामुळे ते बंद आहे. शहरातील करोनाची साथ नियंत्रणात आल्यानंतर महापालिका प्रशासनाकडून शहरातील मर्यादित उद्याने सुरू करण्यात आली असली तरी, या ठिकाणी होणारी गर्दी लक्षात घेता अद्याप ती उघडण्याचा निर्णय झालेला नाही. तसेच देशातील कोणतीही प्राणी संग्रहालये सुरू न झाल्याने पालिकेनेही ते बंदच ठेवण्याचा निर्णय घेतला आहे.