- साडे सहा महिन्यांनंतर उघडणार हॉटेल, रेस्टॉरेंट
पिंपरी – पिंपरी-चिंचवड शहरामध्ये रेस्टॉरंट, फूडकोर्ट सोमवारपासून (दि. 5) 50 टक्के क्षमतेने सुरू होणार आहे. त्यासाठी हॉटेल व्यावसायिकांनी आवश्यक साफसफाई व अन्य कामे सुरू केली आहेत. त्याशिवाय, हॉटेल व परिसराचे निजर्तुंकीकरण करण्याचे काम सुरु झाले आहे. याबाबत कर्मचाऱ्यांना सूचना देण्यात आली आहे. सध्या उपलब्ध मनुष्यबळात 50 टक्के क्षमतेने का होईना रेस्टॉरंट, फूडकोर्ट सुरू करण्याची तयारी केली आहे.
देशभरात 24 मार्चच्या मध्यरात्रीपासून लॉकडाऊन सुरू करण्यात आला. लॉकडाऊन सुरू होऊन सहा महिन्यांचा कालावधी उलटला आहे. लॉकडाऊनपासून हॉटेल, रेस्टॉरंट, फूडकोर्ट, बार बंद होते. राज्य सरकारने 1 सप्टेंबरला जारी केलेल्या नियमावलीनुसार निवासी हॉटेल, लॉज आणि गेस्ट हाऊस पूर्ण क्षमतेने सुरू करण्यास परवानगी दिली. मात्र, रेस्टॉरंट, फूडकोर्ट, बार सुरू करण्यास मुभा दिली नव्हती. दरम्यान, आता त्याला सरकारकडून नुकतीच परवानगी देण्यात आली. सोमवारपासून (दि. 5) त्यानुसार रेस्टॉरंट, फूडकोर्ट, बार सुरू होणार आहेत. त्याबद्दल हॉटेल व्यावसायिकांनी आनंद व्यक्त केला आहे.
प्रयत्नांना मिळाले यश
शहरातील हॉटेल, रेस्टॉरंट, फूडकोर्ट सुरू व्हावे, यासाठी पिंपरी-चिंचवड हॉटेल ऍण्ड रेस्टॉरंट असोसिएशनकडून प्रयत्न सुरू होते. राज्य सरकारकडे त्यासाठी पाठपुरावा केला होता. याबाबत आम्ही राष्ट्रवादी कॉंग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांची देखील भेट घेतली होती. आमच्या प्रयत्नांना यश आले. त्याबद्दल आम्ही समाधानी आहोत. शासनाच्या निर्णयाचे आम्ही स्वागत करतो, असे मत पिंपरी-चिंचवड हॉटेल ऍण्ड रेस्टॉरंट असोसिएशनचे अध्यक्ष पद्मनाभ शेट्टी यांनी व्यक्त केले.
रेस्टॉरंटमध्ये साफसफाई सुरू
लॉकडाऊनमुळे हॉटेल व्यावसायिक आर्थिक अडचणीत सापडले होते. हॉटेल, रेस्टॉरंट, बार सुरू करण्यास परवानगी मिळाल्याने त्यांना दिलासा मिळाला आहे. त्यांनी त्यासाठी आवश्यक साफसफाई व अन्य कामे सुरू केली आहे. हॉटेल, रेस्टॉरंटमध्ये काम करणारे परराज्यातील सर्व कामगार अद्याप परतलेले नाही. त्यामुळे उपलब्ध मनुष्यबळातच त्यांनी हॉटेल, रेस्टॉरंट सुरू करण्याची तयारी ठेवली आहे. प्रवेशद्वारावर सॅनिटायझरची व्यवस्था केली आहे. हॉटेलचे पूर्ण सॅनिटायझेशन केले जात आहे.
लॉकडाऊनपासून जवळपास सहा महिन्यांचा कालावधी उलटल्यानंतर हॉटेल, रेस्टॉरंट सुरू होत आहेत. त्यामुळे आवश्यक साफसफाई व अन्य कामे सुरू झाली आहेत. हॉटेलचालकांसमोर कामगारांची मुख्य समस्या राहणार आहे. 50 टक्के उत्पादन शुल्क, लॉकडाऊन कालावधीतील मिळकत कर माफ करण्याबाबत पाठपुरावा सुरू आहे.
– पद्मनाभ शेट्टी, अध्यक्ष, पिंपरी-चिंचवड हॉटेल ऍण्ड रेस्टॉरंट असोसिएशनहॉटेलमध्ये सध्या आवश्यक साफसफाई सुरू केली आहे. 50 टक्के क्षमतेने का होईना हॉटेल, रेस्टॉरंट सुरू करण्यास परवानगी मिळाल्याने आनंद वाटत आहे. परराज्यात निघून गेलेल्या कामगारांमुळे मनुष्यबळाची कमतरता आहे. मात्र, उपलब्ध कामगारांमध्ये हॉटेल सुरू केले जातील. करोनाचा प्रादुर्भाव टाळण्यासाठी सॅनिटायझर, मास्कचा वापर व अन्य काळजी घेतली जाणार आहे.
– उल्हास शेट्टी, प्रमुख हॉटेल व्यावसायिक