- दिलासदायक परिस्थिती : रिकव्हरी रेटही वाढतोय
पिंपरी – पिंपरी-चिंचवड शहरातील करोनाचा वाढता आलेख गेल्या सात दिवसांपासून उतरणीस येत आहे. जुलै, ऑगस्ट पूर्ण महिना आणि सप्टेंबर महिन्याच्या पहिल्या पंधरवड्यातील करोनाचा वाढता आलेख चिंतेचा विषय होता. पण, आता रुग्णसंख्या कमी होताना दिसून येत आहे. रोजची रुग्णवाढ एक हजाराच्या आत आली आहे. तसेच बरे होणाऱ्या रुग्णांची संख्याही अधिक आहे.
मार्च, एप्रिल आणि अर्धा मे महिना करोनाची रुग्णसंख्या नियंत्रणात होती. जून, जुलै, ऑगस्टमध्ये रुग्णसंख्या वाढीचा वेग जास्त होता. जुलै आणि ऑगस्ट महिन्यात मृत्यूचे प्रमाण देखील अधिक होते. सर्वात जास्त होते. त्याखालोखाल ऑगस्टमध्ये मृत्यूचे प्रमाण होते. 31 ऑगस्टपर्यंत शहरातील रुग्णसंख्या 49 हजार 330 होती.
सप्टेंबरच्या पंधरवड्यात रुग्णसंख्या वाढीचा आलेख उंचावला होता. गणेशोत्सवादरम्यान करोना प्रादुर्भाव मोठ्या प्रमाणात वाढला. त्यानंतर मागील आठवड्यापर्यंत ही रुग्णवाढ सुरू होती. त्यानंतर रुग्णवाढ कमी होताना दिसून येत आहे.
गेल्या आठ ते दहा दिवसांपासून रुग्णसंख्या एक हजाराच्या आतमध्ये आली आहे. त्यामध्ये 28 सप्टेंबरला रुग्णवाढीचा आलेख झपाट्याने खाली आला. यादिवशी शहरामध्ये 554 रुग्णांची नोंद झाली. सप्टेंबर महिन्यात सुमारे 28 हजार नवीन रुग्णांची भर पडली आहे. शुक्रवारी सायंकाळी शहरातील एकूण रुग्णसंख्या 79 हजार 338 वर पोहोचली आहे. त्यातील 72 हजार 164 जण बरे होऊन घरी गेले आहेत. केवळ 5 हजार 837 रुग्णांवर शहरात उपचार सुरू आहेत. सक्रिय रुग्णापेक्षा बरे होणाऱ्या रुग्णांचे प्रमाण जास्त आहे. ही दिलासादायक बाब आहे. तर, शहरातील 1337 जणांचा तर शहराबाहेरील परंतु महापालिका रूग्णालयात उपचार घेणाऱ्या 500 अशा 1837 जणांचा कालपर्यंत कोरोनामुळे मृत्यू झाला आहे.
सहा दिवसांत 5 हजार रुग्ण बरे
मागील सात दिवसांपासून बाधित रुग्णांपेक्षा बरे होणाऱ्या रुग्णांची संख्या वाढली आहे. 27 सप्टेंबर ते 2 ऑक्टोबर या सहा दिवसांमध्ये तब्बल 4 हजार 868 रुग्ण बरे झाले आहेत. त्यांना रुग्णालयातून घरी सोडण्यात आले आहे. त्यामुळे रुग्णालय व कोविड केअर सेंटरमध्ये बेड मिळण्याची चिंता मिटली आहे. बाधित रुग्णांपेक्षा बरे होणाऱ्या रुग्णांचे प्रमाण वाढल्याने समाधान व्यक्त केले जात आहे.
मागील सहा दिवसांतील रुग्ण
दिनांक बाधित रुग्ण मृत्यू बरे झालेले रुग्ण
27 सप्टेंबर-812-22-914
28 सप्टेंबर-554-15-959
29 सप्टेंबर-684-21-806
30 सप्टेंबर -764-17-827
1 ऑक्टोबर-633-9-1236
2 ऑक्टोबर-588-21-1040
निश्चित कारण नाही, मात्र सावध राहणे आवश्यक
अतिरिक्त आयुक्त संतोष पाटील यांनी सांगितले की, पुण्यासह सगळीकडचीच रुग्णवाढ कमी झाली आहे. पिंपरी-चिंचवड शहरातील रुग्णवाढ थोडी कमी झाली ही वस्तुस्थिती आहे. नेमकी कोणत्या कारणामुळे झाली हे निश्चित सांगता येत नाही. परंतु, ऑगस्टमध्ये देखील असा काही कालावधी आला होता. रुग्णालयात ऍडमिशनची मागणी कमी झाली होती. पण, त्यांनतर पुन्हा वाढली होती. त्यामुळे रुग्णवाढ कमी होतेय हे जरी चांगले लक्षण असले. तरी यामुळे निर्धास्त होण्याचे काही कारण नाही. हा आजार संपर्कातून होणारा आहे. त्यामुळे काळजी घेतलीच पाहिजे. क्षमता वाढवतच रहावे लागणार आहे. आगामी सणांच्या काळात जास्त काळजी घेणे आवश्यक आहे. प्रसार होणार नाही याची सर्वांनी दक्षता घेतली पाहिजे.