वडगाव मावळ – शहरातील म्हाडा आणि जलसंपदा विभागाच्या कार्यालयात जाऊन आमदार सुनील शेळके यांनी बैठका घेत प्रलंबित प्रश्नाबाबत माहिती जाणून घेतली. प्रलंबित प्रश्न आणि प्रकल्प त्वरीत मार्गी लावा, अशा सूचनाही आमदार शेळके यांनी अधिकाऱ्यांना बैठकीत केल्या.
म्हाडाच्या पुणे येथील कार्यालयात आमदार शेळके यांनी बैठक घेऊन तळेगाव दाभाडे शहरात म्हाडा अंतर्गत उभारण्यात आलेल्या प्रकल्पांमधील सदनिकाधारकांचा प्रश्न मार्गी लावला आहे. म्हाडाच्या तळेगावमधील प्रकल्पाचे बांधकाम 2018 साली सुरु झाले होते. परंतु अनेक वेळा मुदतवाढ देऊन देखील प्रकल्प पूर्ण झाला नाही. यामुळे येथे सदनिका मिळालेल्या सर्वसामान्य नागरिकांना मात्र मोठा मनस्ताप सहन करावा लागला आहे. प्रकल्पाला म्हाडाकडूनच विलंब झाला असून देखील यातील वाढीव रक्कम सदनिकाधारकांनी भरावी, असा आग्रह म्हाडाकडून करण्यात येत होता. तसेच प्रत्यक्ष ताबा कधी देणार याबाबत अनिश्चितता होती.
15 डिसेंबर पर्यंत मिळणार घरांचा ताबा
आमदार सुनील शेळके, अधिकारी आणि सदनिकाधारक यांच्यासमवेत झालेल्या संयुक्त बैठकीत याबाबत सविस्तर चर्चा झाल्यानंतर A आणि D विंग मधील सदनिका 15 नोव्हेंबर 2023 पर्यंत ताब्यात देण्यात येतील आणि 15 डिसेंबर 2023 नंतर B आणि C विंग मधील नागरिकांना सदनिका ताब्यात देण्यात येतील, असे अधिकाऱ्यांनी आश्वासित केले आहे. तसेच म्हाडाकडून संबंधित सदनिकाधारकांनी वाढीव रक्कम भरावी असे सांगितले होते. ती रक्कम नागरिकांनी भरु नये, असे आवाहन आमदार शेळके यांनी म्हाडातील सदनिका धारकांना केले.
या बैठकीस पुणे गृहनिर्माण व क्षेत्र विकास मंडळाचे मुख्य अधिकारी अशोक पाटील, कार्यकारी अभियंता महेश दातार, उपअभियंता प्रकाश वाबळे, मिळकत व्यवस्थापक अतुल खोडे, उपअभियंता संजय नाईक, म्हाडाचे सदनिकाधारक नागरिक आदी उपस्थित होते.
सिंचनभवन पुणे येथे जलसंपदा विभागाच्या अधिकाऱ्यांसमवेत आमदार सुनिल शेळके यांच्या उपस्थितीत बैठक पार पडली. या बैठकीत मावळ तालुक्यातील गहूंजे-साळुंब्रे, शिवणे-सडवली, थुगाव-बऊर, कडधे-आर्डव या पुलांची कामे जलसंपदा विभागांतर्गत सुरु आहेत. मुख्यत्वे पवना नदीवरील हे सर्व पूल असल्याने या पुलांची कामे पूर्ण झाल्यानंतर या भागातील दळणवळणाला अधिक गती मिळणार आहे. 30 जानेवारी 2024 पर्यंत कामे पूर्ण करुन पुल वाहतुकीसाठी खुले करावेत, शेतकऱ्यांना पाणी परवाने तात्काळ द्यावेत, अशा सूचना आमदार शेळके यांनी अधिकाऱ्यांना केल्या. तसेच पवना पुर्नवसनाचा फेर मोजणी अहवालाचा आढावा यावेळी घेण्यात आला. या बैठकीस मुख्य अभियंता हनुमंत गुणाले, अधीक्षक अभियंता जगताप, कार्यकारी अभियंता श्वेता कुऱ्हाडे, राजू डोबल, उपअभियंता अशोक शेटे, राहुल गव्हाणकर आदी उपस्थित होते.