पाटण – राज्याचे कृषी मंत्री अब्दुल सत्तार यांनी आमच्या नेत्या खा. सुप्रियाताई सुळे यांच्याबद्दल शिवराळ शब्द वापरुन केवळ त्यांचाच नव्हे; तर संपुर्ण महिला वर्ग व तुम्हा-आम्हा सर्वांच्याच माता भगिनींचा अपमान केला आहे. त्यामुळे सत्तारांचा करेल तेवढा निषेध कमीच आहे. परंतु, एवढ्या निषेधाने काहीच होणार नाही.
यासाठी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी चोवीस तासात सत्तारांचा राजीनामा घेऊन मंत्रीमंडळातून त्यांची हकालपट्टी करावी. समस्त महिलांचा अपमान केल्याबद्दल त्यांच्यावर कठोर गुन्हाही दाखल करण्यात यावा. तसे घडले नाही; तर याविरोधात याहीपेक्षा तीव्र आंदोलन छेडण्याचा इशारा राष्ट्रवादीचे नेते सत्यजितसिंह पाटणकर यांनी दिला आहे. अब्दुल सत्तार यांनी खा. सुप्रिया सुळे यांच्याबाबत केलेल्या बेताल वक्तव्याच्या निषेधार्थ पाटण येथे राष्ट्रवादी कॉंग्रेस पक्षाच्या वतीने मंगळवारी 8 रोजी काढण्यात आलेल्या निषेध मोर्चाला संबोधित करताना ते बोलत होते. यावेळी त्यांनी अब्दुल सत्तार यांच्या वक्तव्याचा तीव्र शब्दांत निषेध केला.
श्री. पाटणकर म्हणाले, अब्दुल सत्तार यांना सत्तेचा माज आला आहे. अनेकदा बेताल वक्तव्य करणाऱ्या सत्तारांनी राज्यात ओला दुष्काळ जाहीर करण्याची गरजच नाही; असे म्हणत शेतकऱ्यांचा अपमान केला आहे. या शिंदे-फडणवीस सरकारमधील मंत्री, आमदार दररोज बेताल वक्तव्य करत कोणाचाही अपमान करत आहेत. यांच्याकडून दादागिरी आणि धमकी देण्याचे काम सुरू असतानाही मुख्यमंत्री शिंदे आणि उपमुख्यमंत्री फडणवीस त्यांच्यावर कोणतीही कारवाई करत नाहीत. तर त्यांना पाठीशी घालत आहेत. निदान यावेळी तरी अब्दुल सत्तार यांच्यावर शिंदे व फडणवीस सरकार कठोर कारवाई करणार का? हा माझा त्यांना सवाल आहे. आपला महाराष्ट्र हा शाहू, फुले, आंबेडकर, छत्रपती शिवाजी महाराज, जीजाऊंचा असून येथे महिलांचा आदर व सन्मान केला जातो.
त्यामुळे सुप्रियाताईंचा अपमान आम्हीं कधीही सहन करू शकणार नाही. सुप्रियाताई या तिनवेळा खासदार आहेत. त्यांना तब्बल आठ वेळा संसदरत्न पुरस्कार मिळालेला आहे. संपूर्ण देश त्यांना ताई म्हणून त्यांचा सन्मान करतो. त्यांच्याबद्दल अब्दुल सत्तार यांनी अशा प्रकारचे शब्द वापरणे अत्यंत निंदनीय आहे. सत्तार यांच्या वक्तव्यावरून त्यांचे संस्कार, संस्कृती आणि त्यांना आलेला सत्तेचा माज दिसून येत आहे. मुख्यमंत्र्यांनी जर त्वरित या मुजोर मंत्र्याचा राजीनामा घेतला नाही; तर संपूर्ण राष्ट्रवादी कॉंग्रेस पक्ष रस्त्यावर उतरुन याहीपेक्षा जोरदार आंदोलन करेल, असेही त्यांनी यावेळी सांगितले. दरम्यान, पाटण विधानसभा मतदारसंघ राष्ट्रवादी कॉंग्रेसकडून विविध ठिकाणी सत्तार यांचा निषेध करण्यात आला. यावेळी राष्ट्रवादीचे अध्यक्ष राजाभाऊ शेलार, जिल्हा सरचिटणीस शंकर शेडगे, पाटण अर्बन बॅंक चेअरमन बाळासाहेब राजेमहाडिक, महिला अध्यक्षा सौ. स्नेहल जाधव, तालुका दुध संघ चेअरमन सुभाषराव पवार, पाटण नगराध्यक्षा सौ. मंगल कांबळे, हेमंत पवार, सौ. मिलन सय्यद, सौ. शोभा कदम, सौ. रोहीणी शिर्के, नगरसेवक, नगरसेविका, पदाधिकारी व कार्यकर्ते बहुसंख्येने उपस्थित होते.