बेलसर – पुरंदर अंजिराचे उत्कृष्ट पद्धतीने ब्रॅंडिंग करून नवनवीन बाजारपेठा काबीज करण्याच्या उद्देशाने पुरंदर हायलॅंडस फार्मर्स प्रोड्युसर कंपनी लिमिटेड ही शेतकरी उत्पादक कंपनी कामकाज करीत आहे. त्यांनी “सुपर हिग’ या नावाने पुरंदर अंजीराचा ब्रॅंड
विकसित केला आहे. हॅम्बर्ग (जर्मनी) येथे असलेल्या पिल्झ शिंडलर जी. एम. डी. एच. यांना पाठवलेली चाचणी शिपमेंट यशस्वी झाली आहे. अंजीर या बाजारपेठेत उत्कृष्ट स्वरूपात परिपूर्ण परिस्थितीत पोहोचले आहे आणि तेथील खरेदीदारांनी त्यांची चव घेऊन कौतुकही केले आहे.
गेल्या दोन महिन्यांपासून पुरंदर हायलॅंडस फार्मर्स प्रोड्युसर कंपनी यांनी इजराइल मधील स्टे-पॅक पॅकेजिंग सोल्युशन तज्ज्ञ कोल्डमॅन लॉजिस्टिक आणि वेअर हाऊस आणि जयजिनेंद्र कोल्ड स्टोअर यांच्या सहकार्याने बायर क्रॉप सायन्सच्या फूड चेन विभागासह पॅक हाऊस चाचण्या घेतल्या. 15 दिवसांसाठी अंजीर हे चाचण्यांमध्ये परिपूर्ण स्थितीत असल्याचे आढळले.
पुरंदर तालुक्यातील सिंगापूर गावातील मयूर लवांडे आणि सौरभ लवांडे यांच्या भौगोलिक नामांकन टॅग केलेल्या अंजीर बागेतून अंजीर खरेदी करण्यात आले. केतन वाघ यांनी इजराइल येथून पॅकेजिंग मटेरिअल मागून उपलब्ध करून दिल्यानंतर बायर क्रॉप सायन्सचे चेतन घोट यांनी युरोप करिता आवश्यक तो निर्यात प्रोटोकॉल अमलात आणून संपूर्ण प्रकल्पात आवश्यक ते सहकार्य केले.
मे. पिल्झ शिंडलरची भारतीय उपकंपनी असलेल्या मे सी ऑन अग्रिकॉस ने जर्मनीतील हॅम्बर्ग येथे असलेल्या मुख्यालयात या अंजिराची निर्यात करण्यास मदत केली आहे. चाचणी कन्साइंनमेंट करिता पुरंदर हायलॅंडस फार्मर प्रोड्यूसर कंपनीचे अध्यक्ष रोहन उरसळ यांनी
अहोरात्र प्रयत्न केले असून त्यांचे सहकारी व शेतकरी उत्पादक कंपनीचे संचालक रामचंद्र खेडेकर, अतुल कडलक, गणेश कोलते, समीर इंगळे, सागर लवांडे, दीपक जगताप यांच्यासह इतर संचालकांनी या चाचणी प्रकल्पात आणि निर्यात शिपमेंट मध्ये पुढाकार घेतला आहे.
ही यशस्वी चाचणी कन्साइन्मेंट पुरंदरच्या अंजीर उत्पादक शेतकऱ्यांसाठी मोठी चालना देणारी ठरत असून जगभरातील विविध बाजारपेठांमध्ये पुरंदर अंजीर एक व्यवहार्य कृषिमाल म्हणून निर्यात करण्यासाठी निर्यातदारांकरिता एक नवीन उत्पादन उपलब्ध झाले आहे.
– सुनील पवार,पणन संचालक तथा कार्य.संचालक मराकृपम
पिल्झ शिंडलरची भारतीय उपकंपनी असलेल्या मे सिऑन अग्रिकॉसने जर्मनीतील हॅम्बर्ग येथे असलेल्या मुख्यालयात या अंजिराची निर्यात करण्यास मदत केली. ती निर्यात चाचणी शिपमेंट पुरंदरच्या अंजीर उत्पादक शेतकऱ्यांसाठी मोठी चालना देणारी ठरेल.
– रोहन उरसळ,अध्यक्ष, पुरंदर हायलॅंडस फार्मर्स प्रोड्युसर कंपनी