अरुणकुमार मोटे
सविंदणे -चारचाकी वाहनांच्या सायलेन्सरच्या चोरीचे प्रमाण वाढले आहे. या सायलेन्सरमधून धातूमिश्रित माती सोन्यापेक्षा जास्त भावाने विकली जात आहे. यामुळे राज्यभरात चोरट्यांचे रॅकेट फोफावले आहे. चारचाकी वाहने लक्ष्य केल्याने लाखो रुपयांच्या वाहनांच्या सायलेन्सरची चोरी करून चोरट्यांनी चक्क सायलेन्सरमधून सोन्याचा धूर काढला आहे. लोणी काळभोर येथील आरोपींकडून उलगडा होण्याची शक्यता पोलीस प्रशासनाने वर्तविली आहे.
जिल्ह्यातील औद्योगिक वसाहती असलेल्या खेड, शिरूर, पुरंदर, दौंड, बारामती, मुळशी तालुक्यांमध्ये आर्थिक राहणीमान उंचावले आहे. या तालुक्यांतील सधनता आणि भौतिक सुविधा उच्च दर्जाच्या आहेत. कार्पोरेट कंपन्यांमध्ये अनेकजण कार्यरत आहेत. गेल्या 20 ते 22 वर्षांपासून ही संपन्नता थक्क करणारी आहे. आता अनेकांच्या दारात चारचाकी गाड्या दिमतीला आहेत. यापूर्वी चारचाकी गाड्या, आणि त्याचे कंपन्यांचे लोगो, टायर चोरीले जाण्याचे प्रमाण होते.
ते आजही आहे. मात्र, गेल्या दोन वर्षांपासून चारचाकी गाड्यांच्या सायलेन्सरची चोरी होत आहे. प्रथमदर्शनी ही चोरी पोलीस दप्तरी किरकोळ स्वरूपाची नोंदपत्र घटना वाटत होती. मात्र, जसजसे हे चोरीचे प्रमाण वाढत गेले. त्यामुळे पोलीस प्रशासन चक्रावून गेले. त्यानंतर पोलिसांनी कसून तपास सुरू केला.
सायलेन्सरमधील सुमारे अडीचशे ग्रॅम धातूमिश्रित माती निघत आहे. बाजारपेठेत याला सोन्याहून अधिक भाव मिळत असल्याने जिल्ह्यासह राज्यभरात चोरट्यांची टोळी सक्रिय झाली आहे. धातूमिश्रित मातीपासून व्हाइट गोल्ड तयार होत आहे. ही माती तामिळनाडू, दिल्ली, केरळ आदी राज्यात पाठविले जात असल्याची माहिती मिळत आहे. सोन्याच्या कॅरेटच्यापेक्षाही त्याचा दर्जा अधिक आहे. त्यामुळे चोरीचे प्रमाण वाढले आहे.
लोणी काळभोरमध्ये दोन आरोपी ताब्यात घेतले आहेत. त्यांच्याकडून मुद्देमाल ताब्यात घेतला आहे. त्यांच्याकडे कसून तपास केल्यानंता रॅकेट उघडकीस येण्याची शक्यता आहे. शिरूर, खेड, बारामती, हवेली, दौंड आदी तालुक्यांत चोरट्यांची नजर चारचाकी वाहनांवर स्थिरावली आहे. त्यामुळे दोन वर्षांपासून हा “सिलसिला’ सुरू आहे. गेल्या वर्षी याची सुरूवात झाली होती. त्यावेळी पोलीस प्रशासनाने थोडेफार दुर्लक्ष केले होते.
मात्र, चोरी वाढल्याने पोलीस प्रशासनाने कसून तपास केल्यानंतर हे धक्कादायक सत्य समोर आले आहे. सायलेन्सर चोरीचे अनेक गुन्हे वेगवेगळया पोलीस स्टेशनमध्ये दाखल आहेत. त्यामुळे पार्कींगची व्यवस्था नसलेल्या कारचालकांची चिंता वाढली आहे. कारचालक-मालकांनी कार सिसिटीव्ही कॅमेऱ्याच्या कक्षेत पार्क करावी, असे आवाहन करण्याची वेळ पोलीस प्रशासनावर आली आहे.
कमाईचा शॉर्टकट मार्ग
सध्या कमी वेळात जास्त पैसे कमविण्यासाठी चोरट्यांकडून चक्क सायलेन्सरची चोरी केली जात आहे. सायलेन्सरच्या पुंगळीमध्ये थोडया प्रमाणात धातुमिश्रीत माती असते. तिचा सोन्याचा खाणीमध्ये वापर होतो. त्यामुळे धातूमिश्रित मातीला चांगलाच भाव मिळत आहे. ही गरज ओळखून चोरट्यांनी मोर्चा सायलेन्सर चोरीकडे वळवला आहे. शिरूर तालुक्यात शिरूर शहरासह, सणसवाडी, शिक्रापूर, कोरेगाव भीमा, लोणी काळभोर, लोणीकंद, वाघोली, पुणे, मुंबई या ठिकाणासह राज्यभरात सायलेन्सर चोरी केली जात आहे.
“त्या’ मातीला किलोस 90 हजार रुपये भाव
सायलेन्सरमधील धातूमिश्रित मातीला बाजारपेठेत अंदाजे 80 ते 90 हजार रुपये भाव मिळत आहे. यामुळे चोर या नवीन व्यवसायाकडे वळाले आहेत. इको गाडीचे सायलेन्सर चोरीचे प्रमाण जास्त आहे. या धातूमिश्रित मातीपासून प्लॅटिनम गोल्ड तयार केले जाते.
नागरिकांनी आपआपल्या कार गाडया सुरक्षित ठिकाणी पार्क कराव्यात. काही संशयास्पद हालचाली दिसून आल्यास तात्काळ पोलीस स्टेशनशी संपर्क साधावा. शक्यतो इको कारचे सायलेन्सर जास्त चोरीला जात आहे. त्यांनी गाड्या सीसीटीव्ही कॅमेऱ्याच्या निगराणीत पार्क कराव्यात.
– सुरेशकुमार राऊत,पोलीस निरीक्षक, शिरूर.