पळसदेव/ रावणगाव – युरोपातून सुमारे पाच हजार किलोमीटर लांबीचा प्रवास करून आलेल्या भोरड्या उजनी जलाशयालगत सर्रासपणे पहायला मिळत आहेत. सायंकाळच्या वेळी भोरड्यांची कवायती पाहण्यासाठी पक्षी निरीक्षकांसह ग्रामस्थ गर्दी करीत आहेत. इंदापूर तालुक्यातील भिगवण, मदनवाडी, भादलवाडी, कुंभारगाव, पळसदेव परिसरात भोरड्यांचा सायंकाळचा मुक्काम आहे. लाखोंच्या संख्येने असलेल्या भोरड्या मावळतीच्या सोनेरी प्रकाशात कवायत करतानाचे दृष्य नयनरम्य दिसत आहे.
येथील स्पंदन पर्यावरण राष्ट्रीय विकास संस्थेचे पक्षी निरीक्षक रामकृष्ण येकाळे म्हणाले, गेल्या अनेक वर्षांपासून परिसरात भोरड्या हजेरी लावत आहेत. पाण्यातील झाडे, काटेरी झाडे, वड व पिंपळासारख्या मोठ्या झाडांवर भोरड्यांचा रात्रीचा मुक्काम असतो. रात्रीचा मुक्काम असलेल्या ठिकाणी पोहोचण्याअगोदर भोरड्या उथळ पाण्याच्या ठिकाणी आंघोळ करतात. यानंतर मुक्कामाच्या ठिकाणी उंच आकाशात त्यांची कवायत असते.
कवायतीदरम्यान थव्यांमध्ये भोरड्यांचे अनेक छोटे-मोठे थवे सहभागी होतात. रात्रीचा मुक्काम संपला की सकाळी खाद्यांच्या शोधात सोयीनुसार छोट्या-छोट्या थव्यात विभागणी करून निघून जातात. ज्वारी, किटक, छोटी फळे हे त्यांचे खाद्य आहे. या पक्षांकडून बीज प्रसारणाचे काम मोठ्या प्रमाणावर होत असल्याने या पक्षांना मानवाचा मित्र समजले जात आहे. डिसेंबरमध्ये आलेल्या या पक्षांचा मुक्काम एप्रिलपर्यंत असतो.
काही नौकाचालक पर्यटक व पक्षी अभ्यासकांना भोरड्या पाहण्यासाठी त्यांच्या मुक्कामाच्या ठिकाणी नेत असतात. पर्यटकांनी केवळ त्यांचे निरीक्षण नोंदवून नेत्रसुख घेणे महत्वाचे आहे. मात्र, अनेकदा नौकाचालक या भोरड्यांना हुसकावून त्यांची छायाचित्रे काढतात. वास्तविक त्यांच्या वास्तव्यात अडथळा आणणे योग्य नाही. वनविभागाने पक्षी वसाहत असलेल्या अशा झाडांजवळ जाण्याची बंदी नौकाचालकांवर घालणे गरजेचे आहे.
ऍड. महेश कन्हेरकर, अध्यक्ष, स्पंदन पर्यावरण राष्ट्रीय विकास संस्था.