पिंपरी – पिंपरी-चिंचवड महापालिकेची नोव्हेंबर महिन्याची 20 तारखेला होणारी मासिक सर्वसाधारण सभा रद्द करण्यात आली आहे. पदवीधर व शिक्षक मतदार संघाच्या निवडणुकीच्या आचारसंहितेमुळे सभा आयोजित केली जाणार नसल्याचे पालिका पदाधिकाऱ्यांनी सांगितले.
महापालिकेची नियमित सर्वसाधारण सभा दर महिन्यांच्या 20 तारखेला होते. पदवीधर व शिक्षक मतदार संघासाठी 1 डिसेंबरला मतदान होत आहे. त्याची निवडणूक आचारसंहिता 2 नोव्हेंबरपासून लागू झाली आहे. त्यामुळे सर्वसाधारण सभेसह स्थायी समिती तसेच, विविध विषय समितीच्या सभा घेता येत नाहीत.
आचारसंहितेचा भंग होणार नाही, हे लक्षात घेऊन केवळ अत्यावश्यक कामांना मंजुरी दिली जाऊ शकते, असे जिल्हाधिकाऱ्यांनी महापालिकेस स्पष्टपणे कळविले आहे. त्यामुळे विषय समितीसह स्थायी समितीची सभा तहकूब केली जात आहे. सर्वसाधारण सभा शुक्रवारी होती. मात्र, आचारसंहितेचा भंग होऊ नये म्हणून त्या सभेचे विषयपत्रक तयार करण्यात आले नाही. त्यामुळे सभा होणार नाही. सभेसमोर महत्त्वपूर्ण विषय नसल्याने विषयपत्रिकाही तयार केलेली नाही, असे पक्षनेते नामदेव ढाके यांनी सांगितले.
स्थायी समितीची सभा थेट पुढील महिन्यात
स्थायी समिती सभा बुधवारी 7 डिसेंबरपर्यंत तहकूब करण्यात आली आहे. आचारसंहितेमुळे सभा तहकूब करण्याची वेळ अध्यक्ष संतोष लोंढे यांच्यावर आली. सलग चौथ्यांदा सभा तहकूब झाली आहे. दरम्यान, आता विषयपत्रिकाच तयार केली जाणार नसल्याने थेट पुढील महिन्यातच स्थायीची सभा होणार आहे.