पुणे जिल्हा: पुरंदरमधील घाट रस्त्यांची लागली “वाट’

अपघाताचा धोका : अतिपावसामुळे खड्डेच खड्डे; प्रशासनाचे दुर्लक्ष

दिवे -पुरंदर तालुक्‍यात यंदा अतिपावसामुळे जवळपास सर्वच रस्त्यांची दयनीय अवस्था झाली आहे. त्यातच महत्त्वाचा दिवे आणि चिव्हेवाडी घाटाची वाट लागली असून रस्त्यातील खड्डे चुकविताना वाहनचालकांना कसरत करावी लागत आहे. त्यामुळे अपघाताचा धोका वाढला आहे. तर प्रशासनाचे दुर्लक्ष होत असल्याने आश्‍चर्य व्यक्‍त केले जात आहे. 

पंढरपूर-आळंदी राज्य महामार्गाचे काम गेली कित्येक वर्षे पूर्ण होत नसून राज्य महामार्ग केवळ कुरघोड्या करून “श्रेया’चे राजकारण रंगवले जात आहे. हा राज्य महामार्ग अटलबिहारी वाजपेयी हे पंतप्रधान असताना मंजूर करण्यात आलेला असून गेली 20 वर्षे झाली तरीही या रस्त्याची अवस्था बिकट झाली आहे. केवळ कुरघोड्या करून फक्‍त डागडुजीने प्रवाशांची दिशाभूल केली जात आहे. कधी तिजोरीत खडखडाट, कधी शेतकऱ्यांचे पैसे नसल्याचे सांगितले जाते.

तर कधी शेतकऱ्यांचे आंदोलने सांगून या रस्त्यांवरील निधीही गायब होतो. सध्या रस्त्याच्या रुंदीकरणासाठी भूमिसंपादीत करण्यासाठी शेतकऱ्यांना पैसे वाटप केले जात असून लवकरच काम सुरू होणार असल्याचे आश्‍वासन आमदार संजय जगताप यांनी दिले असल्याने लवकरच सुसाट रस्ता होईल मात्र, तोपर्यंत किमान डागडुजी करून प्रवासायोग्य रस्ता करावा, अशी मागणी जोर धरीत आहे.

चिव्हेवाडी घाटाचीही दुरुवस्था
दोन वर्षांपूर्वी झालेल्या ढगफुटीमुळे चिव्हेवाडी घाट रस्त्याची दुरवस्था झाली होती. तो रस्ता अद्यापही करण्यात आलेला नाही. आता तर अतिपावसामुळे रस्त्याची आणखी वाट लागली आहे. हा रस्ता कोल्हापूर-पुणे महामार्गाला जोडणारा असून या भागातील नारायणपूर व केतकावळे येथील बालाजी मंदिर असल्याने मोठ्याप्रमाणात भाविक, पर्यटक ये-जा करीत असल्याने कायमच वर्दळ असते त्यामुळे शासनाने वनविभागाच्या अधिकाऱ्यांशी चर्चा करून रस्त्याची दुरुस्ती करून द्यावी, अशी मागणी जोर धरीत आहे.

डिजिटल प्रभात आता टेलिग्रामवर! चॅनल जॉईन करा व मिळवा सर्व महत्वपूर्ण अपडेट्स, चॅनल जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा

Leave A Reply

Your email address will not be published.