दादांच्या काटेवाडीत गावगुंडांची दादागिरी

टोळक्‍यांकडून विनाकारण जीवघेणा हल्ला : सर्वसामान्य नागरिक भीतीच्या छायेखाली

भवानीनगर – काटेवाडी (ता. बारामती) गावात वरातीत नाचण्याच्या किरकोळ वादातून झालेल्या भांडणाचा राग डोक्‍यात ठेऊन बाहेरून गुंडगिरी प्रवृत्तीच्या तरुणांच्या मदतीने एकाला जबर मारहाण केल्याने गावातील वातावरण तणावपूर्ण बनले आहे. या प्रकारामुळे सर्वसामान्य नागरिक भयभीत झाले आहेत. गावात गुंडगिरी प्रवृत्ती निर्माण झाल्याने दहशतीचे वातावरण निर्माण झाले आहे. या घटनेबाबत माजी उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी लक्ष द्यावे, अशी मागणी नागरिक करीत आहेत.

काटेवाडी गावात सध्या गुंडगिरी करणारे प्रवृत्तीचे तरुण तयार झाले आहेत. हे तरुण विनाकारण किरकोळ कारणावरून गावात हाणामारी करून दहशत माजवत आहेत. किरकोळ कारणावरून मनात राग धरून त्या तरुणावर पाळत ठेवून व त्याला एकट्याला गाठून जबर मारहाण करून जखमी करीत आहेत. एका तरुणाला चार ते पाच तरुण गुंडप्रवृत्तीचे मारत आहेत. त्यामुळे या मारामारीत निष्पाप तरूणाचा बळी जाण्याची भीती व्यक्‍त होत आहे. तरुण बेशुद्ध पडेपर्यंत मारत राहून पुन्हा हे गुंडगिरी करणारे तरुण पळून जातात.

सध्या गावात दहशतीचे वातावरण निर्माण झाले आहे. इतरही तरुणांवर असा जीवघेणा हल्ला होऊ नये, यासाठी गावातील पालक, नागरिक मानसिक तणावाखाली आहेत. शिक्षण न घेणे, कोणताही व्यवसाय न करणे, गावातून दहशत माजविणे, असे प्रकार घडत आहेत. एसटी बसस्थानकाच्या आवारात मोकाट फिरणे, ज्यावेळी मुली कॉलेजला जातात. त्यावेळी विनाकारण घिरट्या घालणे, काहीवेळा एसटी बस्थानाकातील असलेल्या बाकावर तासन्‌तास बसून राहणे, असे प्रकार करीत आहेत. यामुळे गावातील वातावरण गढूळ बनले आहे.

गावातील किरकोळ भांडणाला मोठे स्वरूप देऊन बाहेरील गुंड गावात बोलावून लोखंडी पाईप, वायररूप, चॉपर, काठी, दगड आदी हत्याराने मारहाण केली जात आहे. यात मारहाणीत एखाद्याचे कुटुंब उद्‌ध्वस्त होणार आहे. गुंडगिरी करणाऱ्या तरुणांवर पोलिसानीही कडक कारवाई करण्याची मागणी सर्वसामान्य नागरिकांतून होत आहे. चारच दिवसांपूर्वी गावातील तरुणावर वार झाला आहे. तो जखमी तरुण अजूनही रुग्णालयात उपचार घेत आहे. गुंडगिरी करणाऱ्या तरुणांवर कारवाई करावी, अशी मागणी ग्रामस्थ पोलिसांना करीत आहेत.

गुंडगिरी प्रवृत्तीचे तरुण गुन्हा करीत असतील तर त्यांना पोलीस सोडणार नाहीत. त्यांच्यावर नक्‍कीच कायदेशीर कारवाई केली जाईल. छोटी- मोठी भांडणे करून आपले स्वत:चे नुकसान तरुणांनी करून घेऊ नये. गुंडगिरी करणाऱ्याना कायद्याच्या कचाट्यातून पोलीस सोडणार नाहीत.

-धन्यकुमार गोडसे, वपोलीस निरीक्षक, बारामती ग्रामीण.

Leave A Reply

Your email address will not be published.