पालखी सोहळ्याच्या नावाखाली रस्त्यांची मलमपट्टी

कामे उरकण्यासाठी निकृष्ट कामांची झलक
इंदापूर तालुक्‍यात प्रशासनाचा दळभद्री कारभार

नीलकंठ मोहिते

रेडा – इंदापूर तालुक्‍यात पालखी सोहळ्याच्या नावाखाली कोट्यवधी रकमेच्या निधीची लूट सुरू आहे. यामध्ये सार्वजनिक बांधकाम विभाग व जिल्हा परिषदेचा बांधकाम विभाग कागदोपत्री दुरुस्तीची कामे दाखवत राजरोस निधी लाटण्याचे काम करीत आहेत. त्यामुळे पालखी सोहळ्याच्या तोंडावर रस्ते कधी दुरूस्त होणार, असा संतप्त सवाल नागरिक आणि वारकऱ्यांतून होत आहे. दुसरीकडे संत सोपानकाका पालखी सोहळ्याच्या इंदापूर तालुक्‍याच्या हद्दीतील रस्त्यावर निकृष्ट दर्जाची दुरुस्ती वेगाने सुरू आहे. आढावा बैठकीत आमदारांसमोर अधिकाऱ्यांचे वाभाडे निघाले आहेत. त्यामुळे पालखी सोहळ्याच्या पार्श्‍वभूमीवर गाजावाजा करणाऱ्या प्रशासनाचा कारभार चव्हाट्यावर आला आहे.

संत तुकाराम महाराजांचा पालखी सोहळा क्षेत्र देहू येथून निघाल्यापासून सर्वात जास्त मुक्‍काम इंदापूर तालुक्‍यात असतो. शासनाने वारकऱ्यांच्या सुविधांसाठी मुबलक निधी पुरवला असताना देखील मूलभूत सुविधा पुरवण्यासाठी प्रशासनातील अधिकारी व संबंधित विभाग कार्यवाही करताना दिसत नाहीत. भाजपचे इंदापूर तालुकाध्यक्ष नानासाहेब शेंडे यांनी आढावा बैठकीत निमगाव केतकी येथे मुक्‍कामी पालखी सोहळा असताना देखील प्रशासनाने तयारी केली नाही. मुख्य पालखी चौथाऱ्यावरील पत्रे बदलले नाहीत, असा थेट आरोप अधिकाऱ्यांसमोर केला. संत सोपानकाका पालखी मार्गावर काही ठराविक ठेकेदारांना हाताशी धरून डागडुजी करण्याची मोहीम संबंधित विभागाने सुरू केली आहे. मात्र, लाखेवाडी गावठाण ते सराटीपर्यंत पालखी सोहळ्यातील रथाला व वारकऱ्यांना रस्त्याच्या साईटपट्टया नसल्याने जीव मुठीत घेऊन जावे लागणार आहे. याचा पाढा आढावा बैठकीत वाचून दाखवला.

चाळीस वर्षांपासून संतराज योगीराज महाराज पालखी सोहळा इंदापूर तालुक्‍यातील महत्त्वाच्या दोन गावांत मुक्‍काम असतो. पालखी सोहळ्यात पाच ते दहा हजार संख्येने वारकरी असतात. मात्र, सोहळ्याचे नियोजन करताना संतराज महाराज यांच्या पालखीचा विचार केला नाही. यावर एका विभागाचे मुख्य अधिकारी यांनी अशी पालखी येते म्हणून संबंधित ग्रामपंचायतीने पत्र द्यावे, असा जावाईशोध लावला. त्यामुळे वारकऱ्यांचे स्वागत कसे होणार, अशी चिंता गावकऱ्यांना सतावत आहे. इंदापूर तालुक्‍यात प्रचंड दुष्काळ आहे.

चारा छावण्या सुरू आहेत. लोकांना व जनावरांना पिण्याचे पाणी नाही, अशा भागात विविध संतांच्या पालख्या मुक्‍कामी येतात. मात्र, सुविधांच्या नावाखाली ठणठणाट आहे.
प्रमुख शासकीय अधिकाऱ्यांनी दाखल होणाऱ्या पालखी सोहळ्यासंदर्भात गांभीर्याने दखल घेतली नाही. जिल्हा परिषदेच्या आरोग्य विभागाने नियोजन केले आहे. आढावा बैठकीत उपजिल्हा रुग्णालयाचे प्रमुख उपस्थित राहू शकत नाहीत. म्हणून त्यांच्यावर कार्यालयीन शिस्तभंगाची कारवाई करण्यासाठी ठराव होत असेल तर अधिकाऱ्यांचा निष्काळजीपणा समोर येत आहे.

इंदापूर तालुक्‍यातील काही गावांतील ग्रामपंचायतींनी स्वतः पुढाकार घेऊन नियोजन करीत आहे. यात सणसर, इंदापूर शहर सराटी गावांचा समावेश आहे. वारकऱ्यांची सेवा व्हावी या उद्देशाने शासन निधी देत आहे. मात्र, काही विभाग चराऊ कुरणच बनले आहे. त्यामुळे प्रशासनाने निधीवर करडी नजर ठेवावी, अशी मागणी नागरिकांतून होत आहे. कुरणातील मोकाट सुटलेले झारीतील शुक्राचार्य शोधण्याची गरज आहे.

Leave A Reply

Your email address will not be published.