निवडणुकीचा बिगूल वाजताच कार्यकर्ते जोमात : कागदपत्रांची जमवाजमव करण्यास प्रारंभ
पुणे – जिल्ह्यातील 231 ग्रामपंचायतींच्या पंचवार्षिक तर 157 ग्रामपंचायतींच्या 226 रिक्त जगांसाठी पोटनिवडणुकीसह 7 रिक्त लोकनियुक्त सरपंचपदासाठी निवडणूक बिगूल वाजताच राजकीय पक्षांचे पदाधिकारी, कार्यकर्ते सक्रिय झाले आहेत. दि. 16 ऑक्टोबरपासून अर्ज दाखल करता येणार आहे. त्यामुळे इच्छुकांची भाऊगर्दी झाली असून, गावगाडा आतापासूनच तापत असल्याचे चित्र आहे. तर निवडणुकीचा निकाल दि. 6 नोव्हेंबरला लागणार असल्याने दिवाळीपूर्वीच फटाक्यांची आतषबाजी पाहायला मिळणार आहे.
दरम्यान, 16 ते 20 ऑक्टोबरपर्यंत अर्ज सादर करणे आवश्यक आहे. 23 ऑक्टोबरला अर्जांची छाननी केली जाणार आहे. 25 ला माघारीची अंतिम तारीख, त्याच दिवशी निवडणूक चिन्ह वाटप होणार आहे. तर 5 नोव्हेंबरला मतदान आणि 6 नोव्हेंबरला निवडणुकीचा निकाल जाहीर केला जाणार आहे. दरम्यान, जिल्ह्यात राजकीय समीकरण पाहिले तर शिंदे गट शिवसेना, शरद पवार गट राष्ट्रवादी कॉंग्रेस, उद्धव बाळासाहेब ठाकरे शिवसेना, भारतीय जनता पक्ष असे प्रमुख पक्ष आहेत.
जानेवारी 2023 ते डिसेंबर 2023 पर्यंत मुदत संपणाऱ्या तसेच ग्रामपंचायतीतील रिक्त जागांच्या पोटनिवडणुकी संदर्भात जिल्ह्यातील एकूण 321 ग्रामपंचायतींचा निवडणूक कार्यक्रम जाहीर करण्यात आला आहे. दिवाळीपूर्वी जिल्ह्यात फटाक्यांची आतषबाजी होणार असून, कोणता पक्ष किती ग्रामपंचायतींवर ताबा मिळू शकतो. येणाऱ्या दिवसात ठरणार आहे.
ग्रामपंचायतीच्या पंचवार्षिक निवडणुका जाहीर होताच त्या त्या गावातील संभाव्य उमेदवार कामाला लागले असून, जनतेतील रामराम वाढला आहे. तालुक्यांतील गावागावांत निवडणुकीची धामधूम वाढली आहे. ग्रामीण पातळीवर या निवडणुका होणार असल्या तरी पक्षीय कार्यकर्ते निवडणुकीत नशीब अजमावण्याच्या तयारीत असून, कागदपत्रांची जमवाजमव सुरू झाली आहे.
राजकीय पक्षांचा कस लागणार
विशेष म्हणजे, ग्रामपंचायतींची ही निवडणूक राजकीय पक्षांच्या दृष्टीने लोकसभेसाठी चाचणी परीक्षाच असेल. राजकीय पक्षांच्या चिन्हावर या निवडणुका होत नसल्या तरी याद्वारे पक्षाचे असलेले प्राबल्य दिसून येते. या निवडणुकांमध्ये सर्वच राजकीय पक्षांचा कस लागेल, हे मात्र निश्चित!
‘कुवत’ नसली तरी कमालीचे महत्त्व
राजकीय उपद्रवमुल्य असणाऱ्या काही इच्छुक उमेदवारांना “आवर’ घालण्यासाठी आता गांव पुढाऱ्यांची मोठी तारेवरची कसरत सुरू झाली आहे. अशा “बंडोबां’ना पुन्हा “थंडोबा’ करण्यासाठी गांवगाड्यातील नेतेमंडळींची पडद्याआडून मोठी कसरत सुरू झाली आहे. “बंडोबांना थंडोबा’ करण्यासाठी स्थानिक नेत्यांना व्युहरचना आखावी लागत आहे. तसेच या बंडोबांना पुन्हा “थंडोबा’ करण्यासाठी राजकीय पुनर्वसनाचाही