गोरे वस्ती कचरा डेपो येथे नागरिकांचे आंदोलन
वाघोली : वाघोलीतील गोरे वस्ती रोडवर असणाऱ्या कचरा डेपोमुळे होणाऱ्या त्रासाला वैतागून गोरे वस्ती परिसरातील नागरिकांनी शनिवारी (दि.१५) आंदोलन करीत कचरा गाड्या येऊ दिल्या नाही. कचरा डेपोमुळे नागरिकांना त्रास सहन करावा लागत असताना प्रशासनाकडून दखल घेतली नाही तर महापालिका कार्यालयात कचरा आणून टाकू असा इशारा स्थानिक नागरिकांकडून देण्यात आला आहे.
अनेक वर्षांपासून गोरे वस्ती रोडलगत असणाऱ्या कचरा डेपोचा प्रश्न धगधगत आहे. पावसाने कचरा कुजत आहे तर उन्हाळ्यात कचरा डेपोला आग लागण्याच्या घटना घडत असतात, दररोज पसरणाऱ्या दुर्गंधीमुळे गोरे वस्ती परिसरातील नागरिकांना जाणे येणे व राहणे मुश्किल झाले आहे. अनेक वर्षांपासून याठिकाणचा कचरा डेपो हटविण्याची मागणी स्थानिक नागरिक व डेपो शेजारील नागरिक करीत आहेत.
वाघोली ग्रामपंचायतीचा समावेश महापालिकेत झाला असतानाही अद्यापपर्यंत ठोस उपाययोजना केल्या जात नसल्याने शनिवारी या कचरा डेपोकडे जाणाऱ्या गाड्या अडविण्यात आल्या. त्रस्त झालेल्या नागरिकांनी कचरा डेपो जवळ आंदोलन करीत कचरा टाकू देणार नाही अशी भूमिका घेतली. या कचऱ्याचा नागरिकांच्या आरोग्यावर वाईट परिणाम होत आहे. हा कचरा डेपो अनधिकृत असून तेथून तो कचरा उचलावा व पुन्हा कचरा टाकू नये अशी भूमिका नागरिकांनी घेतली. येथील कचरा डेपो बंद झाला नाही तर गाडी भर कचरा माहापालिका क्षेत्रीय कार्यालयात टाकला जाईल असा इशारा देण्यात आला आहे.
मार्वल फ्रीया येथील नियोजित कचरा प्रक्रिया प्रकल्पाला विरोध
पुणे महानगरपालिकेच्या वतीने वाघोलीत कचरा प्रक्रिया प्रकल्प उभारण्याचे नियोजन करण्यात येत असताना मार्वल फ्रीया सोसायटीजवळ असणाऱ्या मोकळ्या जागेत कचरा व्यवस्थापन प्रकल्प नियोजित असताना याठिकाणी सोसायट्यामध्ये राहणाऱ्या नागरिकांची संख्या जास्त असल्याने नागरिकांनी या प्रकल्पाला विरोध दर्शविला आहे. यासंबंधित निवेदनही महापालिकेला नागरिकांनी दिले आले असून शनिवारी (दि.१५) सोसायटीतील नागरिकांनी नियोजित कचरा प्रकल्पाला विरोध दर्शविला. वाघोलीतील कचऱ्याचे नियोजन महानगरपालिकेकडून केले जात नसल्याने नागरिकांनी प्रचंड नाराजी व्यक्त केली आहे.