पुणे -वारजे माळवाडी पोलीस ठाण्यातील खुनाच्या प्रयत्नाच्या गुन्ह्यातील “वॉण्टेड’ गुन्हेगार पपुल्या वाघमारे (वय 19) याच्या टोळीने मंगळवारी रात्रभर शहरात धुमाकूळ घातला. त्याच्या टोळीने प्रथम कर्वेनगर परिसरात मध्यरात्री दहा वाहनांची तोडफोड करत तिघांवर प्राणघातक हल्ला केला. यानंतर हे टोळके पहाटे सहकारनगर येथील तळजाई वसाहतीत दाखल झाले. तेथे त्यांनी तब्बल 26 वाहनांची तोडफाड करत दहशत माजवली. त्यांना रोखायला आलेल्या नागरिकांवर कोयते उगारत हल्ला करण्याचा प्रयत्न केला.
त्यानंतर आता सहकार नगर पोलीस स्टेशनच्या हद्दीतून आणखी एक व्हिडिओ समोर आला आहे. एका टोळक्याने भर चौकात गाडी आडवी लावून त्यावर तलवारीने केक कापलाय. बुधवारी मध्यरात्री ही घटना घडली. हा केक कापत असताना या टोळक्याने या ठिकाणी धिंगाणा घातलाय. आरडाओरडा केली. या घटनेमुळे परिसरातील नागरिक काही काळ दहशतीच्या छायेत होते. दरम्यान सहकार नगर पोलिसांचा त्यांच्या हद्दीतील गुंडांवर वचक राहिला की नाही असा प्रश्न आता सर्वसामान्य नागरिक उपस्थित करत आहेत.
पपुल्या गॅंगचा धुमाकूळ, 36 वाहनांची तोडफोड; तीन नागरिकांवर कोयत्याने हल्ला
टोळीवर मोक्का अंतर्गत कारवाई
वारजे माळवाडी आणि तळजाई वसाहत येथे वाहनांची तोडफोड करणाऱ्या पपुल्या वाघमारेसह त्याच्या पाच साथीदारांना मंगळवारी मोक्का लावण्यात आला. त्याच्यावर वारजे माळवाडी आणि अलंकार पोलीस ठाण्यात दोन खुनाच्या प्रयत्नाचे गुन्हे दाखल आहेत. या दोन्ही गुन्ह्यात त्याच्या टोळीला मोक्का लावण्यात आला आहे. त्यांना मोक्का लावताना प्रस्तावात ते मागील दहा वर्षांपासून गुन्हेगारी कृत्य करत असल्याचा उल्लेख आहे. पपुल्या उर्फ दिग्वीजय तुकाराम वाघमारे(19,रा.रामनगर, वारजे माळवाडी), राहुल विठ्ठल वांजळे (24,रा.अहिरेगाव), मारत्या पांडुरंग टोकलवार ( 19,रा.वारजे), बाबा संतोष वांजवडे(19,रा.वारजे) आणि त्यांच्या वॉंटेड नंद्या नावाच्या साथीदाराचा समावेश आहे.
या गुन्ह्यांमध्ये एक अल्पवयीन मुलगाही आहे. मोक्काच्या प्रस्तावात पपुल्याने संघटित टोळी तयार केली असून त्यांनी मागील दहा वर्षात खुनाचा प्रयत्न, अपहरण, बेकायदेशीर जमाव जमवणे, शस्त्र बाळगणे, सरकारी कामात अडथळा आणणे, दहशत पसरवणे, असे गुन्हे केल्याचे म्हटले आहे. तसेच टोळी प्रमुख पपुल्या वाघमारे व त्याच्या टोळीविरुद्ध मागील दहा वर्षाच्या कालावधीत एकापेक्षा अधिक दोषारोपपत्र सक्षम न्यायालयापुढे दाखल केली असल्याचे म्हटले आहे. अपर पोलीस आयुक्त प्रवीण पाटील यांनी ही मान्यता दिली आहे. त्यांनी सकाळी घटनास्थळी भेट दिल्यानंतर पपुल्याच्या टोळीला मोक्का लावण्याचा प्रस्ताव अंतिम टप्प्यात असल्याचे म्हटले होते. दुपारनंतर मोक्का प्रस्ताव मान्य झाला.
पपुल्या टोळीच्या कृत्याची आम्ही गंभीर दखल घेतली असून, टोळीला मोक्का आणि एमपीडीए लावण्याच्या हालचाली जलद करण्यात येत आहेत. या प्रकारची गुंडगिरी कधीच आणि कोणत्याच गुंड टोळीकडून खपवून घेतली जाणार नाही, असे अपर पोलीस आयुक्त प्रवीण पाटील म्हणाले.