कोपरगाव – तालुक्याची कन्या दर्शना पवार हिचा झालेला मृत्यू संशयास्पद असून, त्याची सखोल चौकशी करून तिच्या कुटुंबाला न्याय द्यावा, अशी मागणी राष्ट्रवादी कॉंग्रेसतर्फे तहसीलदार संदीपकुमार भोसले यांना निवेदनात करण्यात आली. महाराष्ट्र लोकसेवा आयोगाची परीक्षा उत्तीर्ण होऊन वनपरिक्षेत्र अधिकारी म्हणून निवड झालेल्या दर्शना पवार (वय 26) हिचा मृत्यू झाला आहे. मागील काही दिवसांपासून बेपत्ता असलेल्या दर्शनाचा मृतदेह सापडला असून, तिच्या मृत्यूमागे घातपात असल्याचे दिसून येत आहे.
तिच्या डोक्यावर व शरीरावर गंभीर जखमा झाल्यामुळे तिचा मृत्यू झाल्याचे शवविच्छेदन अहवालातून समोर आले आहे. त्यामुळे मृत दर्शना हिच्या संशयास्पद मृत्यूची सखोल चौकशी होणे गरजेचे आहे. पोलीस प्रशासनाने तिच्या मृत्यूची लवकरात लवकर सखोल चौकशी करून तिच्या कुटुंबाला न्याय मिळवून द्यावा, असे निवेदनात म्हटले आहे.
या वेळी राष्ट्रवादीचे शहराध्यक्ष सुनील गंगुले, शहराध्यक्षा प्रतिभा शिलेदार, युवती तालुकाध्यक्षा वैशाली आभाळे, जिल्हा सचिव रेखा जगताप, युवक शहराध्यक्ष नवाज कुरेशी, रामदास केकाण, मंदार पहाडे, हाजीमेहमूद सय्यद, राजेंद्र वाकचौरे, अजीज शेख, कृष्णा आढाव, फकीर कुरेशी, दिनकर खरे, माया खरे, चंद्रशेखर म्हस्के, प्रकाश दुशिंग, मधुकर पवार आदी उपस्थित होते.