मुंबई – दिग्दर्शक अनुराग कश्यप वास्तववादी चित्रपटांसाठी ओळखला जातो. कमी बजेटमध्ये हटके आणि काहीतरी भन्नाट कलाकृती उभी करण्याचा अनुराग नेहमीच प्रयत्न करत असतो. मग कधी तो पुण्यातील हत्याकांडावर चित्रपट बनवतो तर कधी मुंबईतील बॉम्ब ब्लास्टवर. गँग्ज ऑफ वासेपूर चित्रपटामुळे अनुरागाला सिनेसृष्टीत एक वेगळी ओळख मिळाली. अनुरागच्या या चित्रपटातील सर्वच कलाकार सुपरहिट ठरले. मात्र हा चित्रपट माझ्यासाठी शाप असल्याचे धक्कादायक विधान नुकतंच अनुरागने केलं.
अनुराग कश्यप आपल्या आगळ्यावेगळ्या क्राईम थ्रिलसाठी प्रसिद्ध आहे. अनुराग शक्यतो एक विषय दुसऱ्यांदा हाताळत नाही. प्रत्येक वेळी तो नवीन काहीतरी घेऊन येत असतो. मात्र आजही त्याच्या वासेपूर या चित्रपटाची चर्चा काही केल्या थांबताना दिसत नाही. नुकतंच अनुरागला या चित्रपटातबाबत पुन्हा एकदा विचारण्यात आले असता हा चित्रपट माझ्यासाठी शाप असल्याचे तो म्हणाला.
अनुराग कश्यप आणि सनी लिओनी यांचा ‘केनेडी’ हा चित्रपट लवकरच प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे. त्यानिमित्त अनुराग कश्यप एका मीडिया हाऊसशी बोलत होता. वासेपूरबाबत बोलताना तो म्हणाला, “गँग्स ऑफ वासेपूर हा माझ्या आयुष्याला मिळालेला शाप आहे. या सिनेमाबद्दल आता मला भीती वाटू लागली आहे. कारण सगळ्यांना मी त्याच धाटणीचा चित्रपट करेन अशी अपेक्षा आहे. असा चित्रपट मी पुन्हा कधीच करणार नाही” असं स्पष्ट मत यावेळी अनुरागने व्यक्त केलं.
गँग्ज ऑफ वासेपूर हा सिनेमा कमी बजेटमध्ये बनलेला असूनही या सिनेमाने इंडस्ट्रीला एक वेगळा पॅटर्न दिला. सध्या अनुराग आपल्या आगामी केनडी या चित्रपटामुळे चर्चेत आहे. नुकतंच केनडी सिनेमाचे स्क्रिनिंग बहुचर्चित कान्स फेस्टिव्हलमध्ये देखील करण्यात आले. भारतात हा चित्रपट केव्हा प्रदर्शित होणार याची तारीख अद्याप निर्मात्यांनी जाहीर केलेली नाही.