वनविभागाचा भोंगळ कारभार; चोवीस तास उलटूनही मृत मोरांकडे दुर्लक्ष
शिक्रापूर (प्रतिनिधी) : गणेगाव खालसा (ता. शिरूर) येथे एका विहिरीमध्ये पडलेल्या भारताचा राष्ट्रीय पक्षी मोराचा मृत्यू झालेला असताना वनविभागाच्या दुर्लक्षित पणामुळे मोर तसाच पडून असल्याने वनविभागाचा भोंगळ कारभार चव्हाट्यावर आला आहे.
गणेगाव खालसा (ता. शिरूर) येथील योगेश चातुर यांच्या विहिरीमध्ये एक सप्टेंबर रोजी सायंकाळच्या सुमारास एक नर जातीचा मोर असल्याचे आढळून आले होते, याबाबत माहिती मिळताच सर्पमित्र गणेश टिळेकर, महाराष्ट्र वन्य पशु पक्षी सामाजिक संरक्षण संस्थेचे सदस्य शेरखान शेख, श्रीकांत भाडळे, अतुल थोरवे यांनी त्या ठिकाणी धाव घेत तेथील मंगेश चातुर, सचिन वर्पे, अनिकेत फंड यांच्या मदतीने पाण्यात पडलेल्या मोराला मोठ्या शिताफीने पाण्याबाहेर काढले परंतु काही वेळातच मोराचा मृत्यू झाला.
त्यानंतर वनविभागाचे शिरूर वनपरिक्षेत्र कार्यालयाचे वनपरिक्षेत्र अधिकारी मनोहर म्हसेकर यांना माहिती देण्यात आली. त्यांनतर प्राणीमित्रांनी त्या मोराला सुरक्षित ठेवले. आज दोन सप्टेंबर रोजी सकाळच्या सुमारास वनपरिक्षेत्र अधिकारी मनोहर म्हसेकर यांच्याशी संपर्क साधला असता आमचा माणूस येऊन मोराला ताब्यात घेऊन जाईल, असे सांगितले. मात्र सायंकाळी उशिरा पर्यंत वनविभागाचा कोणी कर्मचारी भारताच्या राष्ट्रीय पक्षी मोराकडे फिरकला नाही, त्यामुळे वनविभागाचा भोंगळ कारभार सुरु असल्याचे दिसून येत आहे. याबाबत सायंकाळी उशिरा वनपरिक्षेत्र अधिकारी मनोहर म्हसेकर यांच्याशी संपर्क साधला असता आम्ही आत्ता तिकडे गाडी पाठवली असल्याचे वनपरिक्षेत्र अधिकारी मनोहर म्हसेकर यांनी सांगितले.