पिंपरी -मॅनेजर पदावरील दोघांनी टॅंकमधून टेस्टिंगसाठी काढलेल्या पेट्रोल व डिझेलची चोरी केली. तसेच बोगस ग्राहकांच्या नावे खाते बुक तयार करून रोख रक्कम स्वीकारत पेट्रोल पंपाच्या मालकाची एकूण 66 लाख 57 हजार 398 रुपयांची फसवणूक केल्याची घटना समर्थ सर्विस स्टेशन, हिंजवडी येथे घडली.
प्रवीण संपत पवार, संतोष बाबाजी आरण (रा. थेरगाव) अशी आरोपींची नाव आहेत. मोहिनी महेश सोंडेकर (वय 40, रा. संत नगर, मोशी प्रधिकरण) यांनी या प्रकरणी बुधवारी (दि. 2) हिंजवडी पोलीस ठाण्यात फिर्याद दिली. एप्रिल 2019 ते एप्रिल 2021 या कालावधीत हा प्रकार घडला. फिर्यादी यांचा हिंजवडी-वाकड रस्त्यावर पेट्रोल पंप आहे. आरोपी पेट्रोल पंपावर मॅनेजर होते.
आरोपींनी फिर्यादी यांना कोणतीही माहिती न देता त्यांच्या परस्पर अंडरग्राउंड टॅंकमधील पेट्रोल व डिझेल टेस्टिंग साठी काढले. टेस्टिंग झाल्यानंतर ते पुन्हा टॅंकमध्ये न टाकता त्याची चोरी करून विकले. तसेच बोगस ग्राहकांच्या नावे खाते बुक तयार केले. त्यावर त्यांचे खोटे शिक्के मारून रिसीट पंपावरील कर्मचारी गणेश बनसोडे आणि नवनाथ साठे यांना देऊन त्यांच्याकडून पंपावरील रोख रक्कम स्वीकारली.