पुणे – “गणपती बाप्पा मोरया’,”मंगलमूर्ती मोरया’, “पुढच्या वर्षी लवकर या’ अशा जयघोषात, पावसाने लावलेल्या हजेरीमध्ये शनिवारी (दि. 23) पाच दिवसांच्या बाप्पांचे विसर्जन करण्यात आले. याबरोबरच गुरुवारी (दि.21) आलेल्या गौराईचे शुक्रवारच्या (दि.22) जेवण, हळदीकुंकूनंतर आज विसर्जन झाले.
मंगळवारी (दि.19) गणेशाचे भक्तिमय वातावरणात आगमन झाले होते. त्यानंतर दुसऱ्या दिवशी दीड दिवसाच्या गणपतीचे विसर्जन झाले. त्यानंतर तिसऱ्या दिवशी गौरी येतात. पाचव्या दिवशी अनेक घरांमध्ये गणपती-गौरीचे विसर्जन केले जाते. त्यानुसार सकाळपासून विसर्जनाला सुरुवात झाली. शहरातील मध्यवस्तीसह उपनगरांमध्ये गणपती विसर्जनासाठी कृत्रिम हौद निर्माण केले आहेत.
महापालिकेचे फिरते हौदही आहेत. नदीऐवजी या हौदामध्ये विसर्जन करण्यास नागरिकांनी प्राधान्य दिले. गणरायाचा जयघोष करण्यात येत होता. अनेक ठिकाणी “माझ्या पप्पांनी गंम्पती आणला’ हे गाणे वाजत होते. दोन दिवसांपासून शहरात पावसाने हजेरी लावली आहे. आज, पावसामध्ये भिजत अनेकांनी गणरायाला निरोप दिला.