झापवाडी येथे दरोड्याच्या तयारीत असताना आळेफाटा पोलिसांची कारवाई
बेल्हे -ओझर येथे विघ्नहर मंदिरात चोरी करणारे चोरटे आळेफाटा पोलिसांच्या जाळ्यात अडकले आहेत. झापवाडी (ता. जुन्नर) येथे दरोडा टाकण्याच्या तयारीत असताना यातील दोघांना आळेफाटा पोलिसांनी बेड्या ठोकल्या आहेत.
आळेफाटा पोलीस स्टेशन हद्दीत रविवारी (दि. 23) पहाटे 3 ते 4 वाजण्याच्या सुमारास झापवाडी गावचे हद्दीतील एका वस्तीवरील घरावर पाच दरोडेखोर दरोडा घालण्याच्या प्रयत्नात होते. घराताल लोकांना जाग आल्याने त्यांनी उठून आरडा ओरडा केला. यावेळी दरोडेखोरांनी घरावर दगडफेक करून व दहशत निर्माण करून मंगरुळ गावाकडील वनहद्दीकडे दोघे पळून गेल्याचे स्थानिक ग्रामस्थांनी पाहिले. पोलिसांनी तात्काळ गावातील चारही रस्त्यावर नाका-बंदी करून त्यापैकी एक मोटर सायकलचा पाठलाग करून दोन दरोडेखोरांना पकडले. अन्य एकजण जंगलात पळून गेला.
या गुन्ह्यातील आरोपी विठ्ठल पथवे (वय 45) व सोन्या पथवे (वय 28, दोघे रा. अकोले, ता. जि. नगर) यांना अटक करण्यात आली असून सागर पथवे, पिंट्या व सावंत असे तिघेजण अन्य आरोपी फरार आहेत. त्यांच्याकडून मोटारसायकल, गुप्ती, बॅटरी, कोयता आदी साहित्य जप्त करण्यात आले आहे. ही कामगिरी पोलीस निरीक्षक टी. वाय. मुजावर, पोलीस हवालदार भोईर, पोलीस नाईक संदीप फड, कॉन्स्टेबल गोरक्ष हासे, मोमीन, समाधान अहिवळे, होमगार्ड शिरतर यांच्या पथकाने केली.
- आरोपींची कबुली
- ओझरच्या विघ्नहर मंदिरातून जुलैला साधारण दोन किलो वजनाच्या चांदीत घडवलेली सुवर्णलेपीत छत्री चोरट्यांनी पळवून नेली होती. तर गाभाऱ्यात असलेल्या दोन दानपेट्यांपैकी एक दानपेटी फोडून रक्कम लांबवली होती. ही चोरी देखील याच आरोपींनी केल्याचे निष्पन्न झाले असून, या गुन्ह्याच्या तपासासाठी आरोपींना ओतूर पोलिसांच्या ताब्यात देण्यात आले, अशी माहिती मुजावर यांनी दिली.