उद्योजकाला मागितली होती पन्नास लाखांची खंडणी
महाळुंगे इंगळे -पन्नास लाख रुपयांच्या खंडणीची मागणी करीत सुरू असलेले काम बंद पाडल्याप्रकरणी एका खंडणी बहाद्दरावर खंडणीचा गुन्हा दाखल करण्यात आला असल्याची माहिती महाळुंगे इंगळे पोलीस चौकीचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक बालाजी सोनटक्के यांनी दिली.
कुमार गोविंद सुरवसे (रा. खेड, जि. पुणे) असे खंडणीचा गुन्हा दाखल झालेल्याचे नाव आहे. सोमनाथ शांताराम तरस (वय 38, रा. सावरदरी, ता. खेड) यांनी याप्रकरणी महाळुंगे इंगळे पोलीस चौकीत तक्रार दिली.
दि. 2 मार्चला दुपारी दोनच्या सुमारास वराळे (ता. खेड) येथील जमिनीत तरस यांच्या मालकीच्या जागेत कुमार सुरवसे याने प्रवेश केला. त्यांच्या जागेशेजारी दत्तात्रय लोंढे यांच्या जागेचा व्यवहार पूर्ण करून देण्यासाठी वेळोवेळी मध्यस्थामार्फत तडजोडीसाठी तरस यांच्याकडे 50 लाख रुपयांची मागणी केली.
त्यानंतर तरस यांच्या जागेत सुरू असलेल्या पत्र्याच्या शेडचे काम बंद करून कॉन्ट्रॅक्टर निलेश लाला वाघ याला दमबाजी केली, की तुझ्या मालकाला पन्नास लाख रुपये द्यायला सांग नाहीतर मी काम करू देणार नाही. कॉन्ट्रॅक्टर व त्याच्या कामगारांना शिवीगाळ, दमदाटी करीत काम बंद पाडले. याप्रकरणी तरस यांनी दिलेल्या तक्रारीनुसार कुमार सुरवसे याच्यावर खंडणीचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे.