दोन दिवसांत निविदा न मागविल्यास 35 लाख तरतूद राहणार अखर्चित
नगर – जिल्हा परिषदेच्या शिक्षण, आरोग्य, पशुसंवर्धन व समाजकल्याण समितीच्या सदस्यांचा एकत्रित अभ्यास दौऱ्याचे नियोजन करण्यात आले होते. दिल्ली व सिमला या ठिकाणी जाण्याचे ठरले पण करोना व्हायरसमुळे दिल्लीला जायचे की नाही या द्विधामनस्थिती जिल्हा परिषदेचे पदाधिकारी सापडले आहेत. येत्या दोन दिवसात निविदा मागवून या दौऱ्यासाठी तरतूद करण्यात आलेले 35 लाख रुपये खर्च न झाल्यास हा निधी मार्चअखेरस अखर्चित राहण्याची शक्यता निर्माण झाली आहे.
जिल्हा परिषद सदस्यांसाठी दरवर्षी अभ्यास दौऱ्यासाठी जिल्हा परिषद स्वनिधीतून तरतूद करण्यात आली आहे. त्यामुळे आरोग्य, शिक्षण, पशुसंवर्धन व समाजकल्याण या चार समितीच्या सभापतींसह सदस्यांचा अभ्यास दौऱ्याचे या महिन्यात नियोजन करण्यात आले होते. त्यानुसार जिल्हा परिषद अध्यक्ष राजश्री घुले यांच्या उपस्थितीत झालेल्या पदाधिकाऱ्यांच्या बैठकीत सुरवातीला घोटी व सिमला या ठिकाणी अभ्यास दौऱ्याला जाण्याचे ठरले होते. अर्थात या थंड हवेच्या ठिकाणी पदाधिकाऱ्यांनी अभ्यास दौरा काढण्याचे नियोजन केले होते. परंतु या ठिकाणी शैक्षणिक काहीच पाहण्यासाठी नसल्याने दिल्लीत दिल्ली महापालिकेने उभारलेल्या शाळा पाहण्याचे ठरले. त्यात दिल्लीबरोबरच सिमलाही निश्चित करण्यात आले होते.
परंतु गेल्या महिन्याभरापासून भारतातील काही भागात करोना व्हायरसची लागण झाल्याचे रुग्ण आढळू लागले आहे. त्यात दिल्लीमध्ये देखील रुग्ण आढळल्याने पदाधिकाऱ्यांची द्विधामनस्थिती झाली आहे. त्यामुळे सध्या तरी या अभ्यास दौऱ्याचे कोणीच नाव काढीत नसल्याचे दिसत आहे. मात्र मार्चअखेर हा निधी खर्च झाला नाही तर अखर्चित निधी राहणार आहे. अर्थात हा निधी पुढील वर्ष वापरता येणार आहे. पण एका वर्षात दोन अभ्यास दौरे काढता येणार नाही. पुढील वर्ष एका अभ्यास दौरा होईन. यावर्षी मात्र अभ्यास दौऱ्यास जाता येणार नाही.
सदस्यांना अंधारात ठेवून दौऱ्याचे नियोजन
अभ्यास दौऱ्याबाबत पदाधिकाऱ्यांमध्ये दोन वेळा बैठक झाली आहे. या बैठकीला सदस्याचे मत मात्र घेण्यात आलेले नाही. त्यामुळे पदाधिकारी परस्पर सदस्यांना गृहीत धरून अभ्यास दौऱ्याचे नियोजन करीत असल्याने अनेक सदस्यांनी नाराजी व्यक्त केली.
अध्यक्षांनी झटकीपट निर्णय द्यावा
यापूर्वी पदाधिकारी व सदस्यांचा अभ्यास दौरा झाला. स्थायी व जलव्यवस्थापन समितीच्या सदस्यांच्या दौऱ्याचे नियोजन व निविदा प्रक्रिया अवघ्या काही दिवसांत करण्यात आली. तत्कालिन अध्यक्ष शालिनी विखे यांनी हा अभ्यास दौरा यशस्वी केला. पण विद्यमान अध्यक्ष राजश्री घुले झटकीपट निर्णय देत नसल्याने या अभ्यास दौऱ्यावर प्रश्नचिन्ह निर्माण होत असल्याचे बोलले जात आहे.