सव्वालाखाचा मुद्देमाल वाहनांसह जप्त
आरोपींच्या विरोधात वेगवेगळ्या पोलीस ठाण्यांत अनेक गुन्हे
नगर (प्रतिनिधी) – शनिशिंगणापूर रस्त्याने राहुरीच्या दिशेने नगर-मनमाड महामार्गावर दरोडा टाकण्यासाठी निघालेली सराईत सहा गुन्हेगारांची टोळी स्थानिक गुन्हे शाखेच्या पथकाने गजाआड केली. नगर- मनमाड महामार्गावरील शनिशिंगणापूर फाट्याजवळ शनिवारी रात्री साडेनऊच्या सुमारास ही कारवाई करण्यात आली.
आरोपींकडून दोन दुचाकींसह हत्यारे व मिरची पूड असा एकूण सव्वालाख रुपयांचा ऐवज जप्त करण्यात आला.
सागर अण्णासाहेब भांड (वय-24, रा. माऊली जिमजवळ, नागापूर, नगर), किरण रावसाहेब जरे (वय-33, रा. वारुळाचा मारुती मंदिराजवळ, नालेगाव, नगर), अमोल जगन कदम (वय-28, रा. दरेवाडी, सोलापूर रोड, नगर), श्रीकांत सुरेश लाहुंडे (वय-19, रा. ताराहाबाद, ता. राहुरी), अल्लाउद्दिन इब्राहिम शेख (वय-23, रा. अंबिकानगर, कोल्हार, ता. राहाता) व दीपक रविकांत उपाध्याय (वय-25, रा. तलाठी ऑफिसमागे, नवनागापूर, नगर) अशी अटक केलेल्या आरोपींची नावे आहेत. नितीन ऊर्फ सोन्या मच्छिंद्र माळी (रा. गोधेगाव, ता. नेवासा, हल्ली रा. मोरे चिंचोरा, ता. नेवासा) हा मात्र पसार झाला.
स्थानिक गुन्हे शाखेचे निरीक्षक दिलीप पवार यांना मिळालेल्या खात्रीशिर माहिती नुसार आरोपी नगर- मनमाड महामार्गावर दरोडा टाकण्याच्या तयारीत होते. त्यामुळे पवार यांनी तत्काळ सहायक पोलीस निरीक्षक शिषिरकुमार देशमुख, सहायक फौजदार सोन्याबापू नाणेकर, हेड कॉन्स्टेबल बाळासाहेब मुळीक, पोलीस नाईक रवींद्र कर्डिले, सचिन आडबल, अशोक गुंजाळ, शिवाजी ढाकणे, रणजित जाधव, रवी सोनटक्के, विजयकुमार वेठेकेर, दत्तात्रय गव्हाणे, मनोहर गोसावी, दीपक शिंदे, मेघराज कोल्हे, संभाजी कोतकर, सचिन कोळेकर यांच्या पथकाने नगर-मनामड महामार्गावरील शनिशिंगणापूर फाट्यावर शनिवारी रात्री साडेनऊच्या सुमारास सापळा लावला असता, तीन दुचाकी येताना दिसल्या. पोलिसांनी त्या थांबवून सहा जणांना ताब्यात घेतले. एक आरोपी मात्र दुचाकीवरून पसार झाला.
आरोपींकडून दोन दुचाकी, लोखंडी कोयता, सत्तूर, दांडके, नायलॉन दोरी, सुरा, मिरची पूड, मोबाईल असा एकुण एक लाख 21 हजार 550 रुपयांचा मुद्देमाल जप्त केला. आरोपींच्या विरोधात राहुरी पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला असून पुढील कार्यवाही राहुरी पोलीस करत आहेत.
आरोपी भांड याच्या विरोधात 19 गुन्हे
प्रमुख आरोपी सागर भांड हा सराईत गुन्हेगार असून, त्याच्या विरोधात गेल्या दोन वर्षात वेगवेगळ्या पोलीस ठाण्यात तब्बल 19 गंभीर स्वरूपाचे गुन्हे दाखल आहेत. संगमनेर, एमआयडीसी, राहुरी, कोतवाली, शिर्डी, सुपा या पोलीस ठाण्यांमध्ये हे गुन्हे दाखल आहेत. भांड याने सर्वाधिक गुन्हे एमआयडीसी पोलीस ठाण्याच्या हद्दित केलेले आहेत. भांड याच्या प्रमाणेच आरोपी किरण जरे याच्या विरोधात गंभीर स्वरूपाचे नऊ तर दीपक उपाध्याय याच्यावर गुन्हे दाखल आहेत.