मुंबई – दिल्लीत सुरू असलेल्या G-20 बैठकीवर करोनाची छाया पसरली आहे. अमेरिकेच्या फर्स्ट लेडी जिल बिडेन यांना कोरोनाची लागण झाल्यानंतर स्पेनचे राष्ट्राध्यक्ष पेड्रो सांचेझ आता कोविड पॉझिटिव्ह झाले आहे. त्यांनी स्वतः याबाबत माहिती दिली आहे. सांचेझ आधी G-20 परिषदेत सहभागी होण्यासाठी भारतात येणार होते, पण आता त्यांच्या जागी स्पेनचे उपराष्ट्रपती आणि परराष्ट्र मंत्री येणार आहेत.
एक्सवर माहिती देताना सांचेझ म्हणाले की, ‘सध्या मला बरे वाटत आहे. आज दुपारी माझी कोरोना चाचणी पॉझिटिव्ह आली आहे. त्यामुळे मी G20 शिखर परिषदेसाठी नवी दिल्लीला जाऊ शकणार नाही. मला बरे वाटत आहे. प्रथम उपराष्ट्रपती आणि आर्थिक व्यवहार मंत्री आणि परराष्ट्र व्यवहार मंत्री, युरोपियन युनियन आणि सहकार मंत्री स्पेनचे उत्कृष्ट प्रतिनिधित्व करतील. ते म्हणाले की, G20 शिखर परिषदेत स्पेनचे प्रथम उपाध्यक्ष नादिया कॅल्विनो सांतामारिया आणि परराष्ट्र मंत्री जोस मॅन्युएल अल्बेरेस हे प्रतिनिधित्व करतील.’
याआधी चीनचे राष्ट्राध्यक्ष शी जिनपिंग आणि रशियाचे अध्यक्ष व्लादिमीर पुतिन यांनीही शिखर परिषदेतून माघार घेतली आहे. त्याऐवजी चीन आणि रशियाचे प्रतिनिधी या बैठकीला उपस्थित राहणार आहेत. अर्जेंटिनाचे राष्ट्राध्यक्ष अल्बर्टो फर्नांडिस G-20 बैठकीत सहभागी होण्यासाठी दिल्लीत पोहोचले आहेत. दरम्यान, जपानचे पंतप्रधान फुमियो किशिदा आणि अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष जो बिडेन दिल्लीला रवाना झाले आहेत. बिडेन संध्याकाळी 6.55 वाजता दिल्लीला पोहोचतील.