नवी दिल्ली – अनंतनागमध्ये शहीद झालेले कर्नल मनप्रीत सिंग यांच्यावर त्यांच्या मूळ गावी भदौजियान येथे पूर्ण लष्करी सन्मानाने अंत्यसंस्कार करण्यात आले. यावेळी हजारोंच्या संख्येने लोक या हुतात्माच्या अंत्यदर्शनासाठी आले होते. शहीद यांचे बंधू संदीप सिंह आणि त्यांचा मुलगा कबीर यांनी अंत्यसंस्कार केले. यावेळी उपस्थित सर्वांनी कर्नल यांच्यासाठी जय हिंदची घोषणाबाजी केली.
पंजाबचे राज्यपाल बनवारीलाल पुरोहित यांनी शहीदांना श्रद्धांजली वाहिली आणि कुटुंबाचे सांत्वन केले. पंजाबचे मंत्री चेतन सिंह जोडमाजरा आणि मंत्री अनमोल गगन मान हे देखील अंत्यसंस्काराला उपस्थित होते. कर्नल मनप्रीत यांच्या मुलाने वडिलांना आर्मी ड्रेस घालून सलामी दिली. यावेळी एसपी डॉ. संदीप गर्ग आणि डीसी आशिका जैन यांच्यासह वरिष्ठ अधिकारी उपस्थित होते.
यावेळी कर्नलयांच्या अंत्यदर्शनासाठी संपूर्ण गाव जमले आहे.सैन्यदलाच्या वतीने त्यांना मानवंदना देऊन निरोप देण्यात आला. यावेळी शहीद कर्नल मनप्रीत सिंग अमर रहे यासह भारत माता की जयच्या घोषणांनी संपूर्ण गाव दुमदुमून गेला होता.
शहीद कर्नल यांच्या अंत्यसंस्कारापूर्वी लष्कराच्या अधिकाऱ्यांनी गावात पोहोचून स्मशानभूमी आणि त्याकडे जाणाऱ्या रस्त्याला भेट देऊन पाहणी केली होती. यावेळी श्रद्धांजली वाहण्यासाठी पंचक्रोशीतील नागरिकांसह सरकारी अधिकारी देखील उपस्थित होते.