कामगारांची स्वेच्छानिवृत्ती आणि थकीत वेतनाचा प्रश्न मार्गी
पिंपरी – केंद्र सरकारकडून हिंदुस्थान अँटिबायोटिक्स कंपनीला 163 कोटी 85 लाख रुपयांचा निधी नुकताच मिळाला आहे. या निधीतून 116 कामगारांना मार्च 2020 अखेर स्वेच्छानिवृत्ती देण्यात आली आहे. तर, 502 कामगारांचे फेब्रुवारी 2020 पर्यंतचे थकीत वेतन अदा करण्यात आले आहे.
देशभरात सध्या करोना विषाणूचे संकट आहे. त्याविरुद्ध संपूर्ण देश लढत आहे. या बिकट परिस्थितीतदेखील पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी एचए कंपनीतील कामगारांची आर्थिक समस्या दूर करण्यासाठी भरघोस मदतीचा हात दिला आहे. केंद्र सरकारकडून जुलै 2019 मध्ये एचएसाठी 280 कोटी 15 लाख इतका मदत निधी मंजूर झाला होता. त्यातील 116 कोटी 30 लाख रुपयांचा निधी एचएला जानेवारीच्या पहिल्या आठवड्यात मिळाला. त्या निधीतून कंपनीतर्फे यापूर्वी 250 कामगारांना स्वेच्छानिवृत्ती देण्यात आली. त्यांची काही देणी मात्र सध्या प्रलंबित आहेत.
केंद्राकडून मंजूर 280 कोटी 15 लाख रुपयांच्या निधीपैकी दुसऱ्या टप्प्यात 163 कोटी 85 लाख रुपयांचा निधी मिळाल्याने हिंदुस्थान अँटिबायोटिक्स मजदूर संघ आणि एचए ऑफिसर्स असोसिएशन यांनी केंद्र सरकारचे आभार मानले आहेत. संबंधित निधीतून 502 कामगारांना फेब्रुवारी 2020 पर्यंतच्या 29 महिन्यांची थकीत वेतनाची रक्कम आणि मार्च 2020 अखेर 116 कामगारांना
स्वेच्छानिवृत्ती देण्यात आली आहे.
केंद्रीय अर्थमंत्री निर्मला सीतारामन, रसायन खात्याचे केंद्रीय मंत्री सदानंद गौडा, राज्यमंत्री मनसुख मांडविया, एचए कामगार संघटनेचे अध्यक्ष खासदार मनोज कोटक, भारतीय मजदूर संघाचे प्रदेशाध्यक्ष अण्णा धुमाळ, एचए कंपनीचे व्यवस्थापन, भाजपाचे शहराध्यक्ष आमदार महेश लांडगे, सामाजिक कार्यकर्ते महेश दिवाण आदींचे मोलाचे सहकार्य लाभले असल्याचे एचए मजदूर संघाचे उपाध्यक्ष विजय पाटील आणि सरचिटणीस संजय भोसले यांनी नमूद केले. केंद्राकडून एचएला मदतनिधी मिळाल्याबद्दल एचए मजदूर संघाचे राजेंद्र जाधव, आबू भारणे, प्रवीण मोरे तसेच एचए ऑफिसर्स असोसिएशनचे कैलास नरूटे, भूषण राव, नितीन नलावडे यांनी समाधान व्यक्त केले.