कर्जत -येथील मुलींच्या शासकीय वसतिगृहाची इमारत अतिशय सोयी-सुविधांनी युक्त झाली. पुढील काळात वसतिगृहांच्या दर्जेदार शैक्षणिक सुविधांसाठी निधी कमी पडू दिला जाणार नाही, असे प्रतिपादन सामाजिक न्याय व विशेष सहाय्य मंत्री धनंजय मुंडे यांनी आज येथे केले.
सामाजिक न्याय विभागाच्या कर्जत येथील डॉ. बाबासाहेब आंबेडकर मागासवर्गीय व आर्थिकदृष्ट्या मागास मुलींचे शासकीय वसतिगृहाची नवीन इमारत, सिद्धार्थ बोर्डिंग या अनुदानित वसतीगृहाच्या नवीन इमारतीचे उद्घाटन तसेच विशेष मोहिमेतील लाभार्थ्यांना लाभ मंजुरी आदेश वाटप मंत्री मुंडे यांच्या हस्ते करण्यात आले. त्यावेळी ते बोलत होते. याप्रसंगी आमदार रोहित पवार, कर्जतच्या नगराध्यक्षा उषा राऊत, जिल्हाध्यक्ष राजेंद्र फाळके, सार्वजनिक बांधकाम विभागाचे अधीक्षक अभियंता जयंत कुलकर्णी, कार्यकारी अभियंता संजय पवार, समाजकल्याण नाशिक विभागाचे प्रादेशिक उपायुक्त भगवान वीर, सहाय्यक आयुक्त राधाकिसन देवढे उपस्थित होते.
मुंडे म्हणाले, कर्जत शासकीय वसतिगृहाच्या बांधकामास मंजूर अंदाजपत्रकापेक्षा कमी निधी खर्च झालेला आहे. बचत झालेल्या पैशातून याचे वसतिगृहाच्या पायाभूत सुविधांसाठी निधी खर्च केला जाईल. यावेळी जिल्ह्यातील तृतीयपंथीयांना ओळखपत्र व प्रमाणपत्रांचे मंत्री मुंडे यांच्या हस्ते वाटप करण्यात आले.