निघोजच्या ग्रामपंचायत सदस्यांचे अपहरण करणारे फरार

पारनेर (प्रतिनिधी) – तालुक्यातील निघोज येथील सरपंच निवडणुकीमध्ये मोठे राजकारण झाले. तेथे दोन सदस्यांचे अपहरण करून त्यांना मतदानापासून गैरहजर ठेवण्यात आले. अपहरण केलेले सदस्य पुन्हा परतल्यानंतर त्यांनी आपले अपहरण झाले होते, त्यामुळे आपण मतदानापासून वंचित राहिलो, याबाबत जबाब दिला आहे. त्यामुळे निघोज येथील राजकारणाला नाट्यमय वळण मिळाले आहे.

पारनेर तालुक्यातील सर्वात मोठी व बहूचर्चित अशी निघोज ग्रामपंचायतची 9 फेब्रुवारी रोजी सरपंच पदाची निवडणूक असताना दिगंबर भागाजी लाळगे व गणेश कवाद या दोन ग्रामपंचायत सदस्यांचे मतदानाच्या दोन दिवस आधी गावातीलच विरोधी गटातील गुंड प्रवृतीच्या साधारण 20 ते 25 लोकांनी खेड परीसरातून शस्त्रांचा धाक दाखवून अपहरण केले होते.

याबाबत पोलीस स्टेशनमध्ये गुन्हा दाखल आहे. खेड पोलिसांकडून मिळालेल्या माहितीप्रमाणे सदर घटनेबाबत गैरकारदेशीर लोकांकडून शस्त्राचा धाक दाखवून मारहाण करून दोघाजणांचे अपहरण केलेबाबत विठ्ठल भाउसाहेब कवाद (रा. निघोज) यांचे फिर्यादीवरून गुन्हा नोंद करण्यात आला होता. तरी यातील अपहरण करण्यात आलेल्या दिगंबर लाळगे व गणेश कवाद यांनी खेड पोलीस ठाणेत त्यांचेसोबत झालेल्या गैरकृत्याचे सत्य कथन करून जबाब दिला आहे. त्यांनी दिलेल्या जबाबानंतर निघोजमधील त्यांचे विरोधी गटाचे धाबे दणाणले असून त्यांची आता अटकेपासून बचाव करणेसाठी पळापळ सुरू झालेली आहे.

दरम्यान, खेड पोलिसांकडून मिळालेल्या माहितीनूसार निघोज ग्रामपंचातीचे सदस्य सचिन वराळ, मंगेश वराळ यांनी अटकेच्या भितीपोटी अटकपूर्व जामीनासाठी खेड न्यायालयात धाव घेतली आहे. तसेच विठ्ठल कवाद यांनी दिलेल्या फिर्यादीमधील आरोपी सुनिल वराळ,निलेश घोडे, अजय वराळ, धोंडीभाऊ जाधव, राहूल वराळ व इतर असे फरार झाले आहेत. अपहरण कृत्यामध्ये गावातील अजूनही बड्या नेत्यांचा हात असल्याचे निघोज ग्रामस्थांमध्ये दबक्या आवाजात चर्चा चालू आहे.

डिजिटल प्रभात आता टेलिग्रामवर! चॅनल जॉईन करा व मिळवा सर्व महत्वपूर्ण अपडेट्स, चॅनल जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा

Leave A Reply

Your email address will not be published.