रेखा जरे खून प्रकरण : स्टँडिंग वॉरंट विरोधीतील बोठेची याचिका फेटाळली

जिल्हा न्यायालयात केला होता पुनर्निरीक्षण अर्ज

नगर (प्रतिनिधी) – यशस्विनी महिला ब्रिगेडच्या अध्यक्षा तथा राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या कार्यकर्त्या रेखा जरे खून प्रकरणातील संशयित मुख्य सूत्रधार बाळ बोठेे याची पोलिसांनी मिळविलेल्या स्टँडिग वॉरंट विरोधीतील याचिका आज जिल्हा न्यायालयाने फेटाळली. पारनेर न्यायालयाने बोठेच्या विरोधात काढलेल्या स्टॅडिंग वॉरंटविरूद्ध बोठे याच्यावतीने पुनर्निरीक्षण अर्ज जिल्हा न्यायालयात दाखल करण्यात आलेला होता.

जिल्हा न्यायाधीश श्रीकांत आणेकर यांनी तो अर्ज आज फेटाळून पारनेर न्यायालयाने दिलेला निकाल कायम ठेवला. 30 नोव्हेंबर 2020 रोजी रेखा जरे यांची नगर-पुणे रस्त्यावरील जातेगाव घाटात रात्री उशिरा गळा चिरून हत्या झालेली आहे. त्यात बाळ बोठे मुख्य संशयित आरोपी असल्याचे पोलीस तपासात समोर आले.

पोलीस अधीक्षकांनी बोठे याच कटाचा संशयित मुख्य सूत्रधार असल्याचे घोषित केल्यापासून बोठे पसार आहे. त्याचा जामीन अर्ज जिल्हा न्यायालय व त्यानंतर औरंगाबाद खंडपीठानेही फेटाळून लावला आहे. तथापि, तो पोलिसांना तो सापडत नसल्याने पोलिसांनी त्याच्याविरूद्ध पारनेर न्यायालयाकडून स्टॅडिंग वॉरंट मंजूर करून घेतलेले आहे. 

या वॉरंटला बोठे याच्याकडून जिल्हा न्यायालयात आव्हान देण्यात आले होते. त्यावर सुनावणी घेत न्यायाधीश श्रीकांत आणेकर यांनी बोठे याचा अर्ज फेटाळून लावला.

पुनर्निरीक्षण अर्जामध्ये सरकारी पक्षच्या वतीने अतिरीक्त सरकारी वकील अनिल ढगे यांनी जिल्हा सरकारी वकील सतिश पाटील यांच्या मार्गदर्शनाखाली युक्तिवाद केला. सरकारी पक्षाने केलेला प्रभावी युक्तिवाद ग्राहय धरून न्यायालयाने आरोपीचा पुनर्निरीक्षण अर्ज फेटाळला. 

मात्र, अजुनही बोठे पोलिसांना सापडलेला नाही. अलिकडेच त्याचा ठावठिकाणा लागल्याची माहिती पालकमंत्री हसन मुश्रीफ यांनी माध्यमांना दिली होती. 

डिजिटल प्रभात आता टेलिग्रामवर! चॅनल जॉईन करा व मिळवा सर्व महत्वपूर्ण अपडेट्स, चॅनल जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा

Leave A Reply

Your email address will not be published.