करोना निर्बंधांचे उल्लंघन करणार्या मंगल कार्यालयांना दणका
जिल्हाधिकारी-पोलीस अधीक्षक उतरले रस्त्यावर; वर्हाडींची झाडाझडती
नगर (प्रतिधिधी) – करोनाच्या वाढत्या प्रादुर्भावामुळे जिल्हाधिकारी राजेंद्र भोसले व पोलीस अधीक्षक मनोज पाटील यांनी आज नगर-औरंगाबाद रस्त्यावरील मंगल कार्यालयांना आज अचानक भेट दिल्या. त्यात नियमांची पायमल्ली करणार्या वर्हाडी मंडळीची चांगलीच झाडाझडती घेतली. तीन कार्यालय मालकांवर थेट दंडात्मक कारवाई करण्यात आली असून, पुन्हा असा प्रकार आढळल्यास त्यांचे परवानेच रद्द करण्याची ताकीद दिली आहे. अहमदनगर महाविद्यालय परिसरात विनामास्क फिरणार्यांवरही यावेळी कारवाई करण्यात आली.
करोनाचा संसर्ग पुन्हा वाढू लागल्याने राज्य सरकारने सजग पाऊले उचलण्यास सुरूवात केली आहे. त्या पार्श्वभूमीवर जिल्हा प्रशासनाने नियमावली लागू केली आहे. धार्मिक, सामाजिक कार्यक्रमांवर निर्बंध घालण्यात आले असून, विवाह सोहळ्यासाठी अवघ्या 50 लोकांना परवानगी देण्यात आलेली आहे. परंतु, नागरिक नियमांचे पालन करीत नसल्याचे समोर आल्याने आज जिल्हाधिकारी राजेंद्र भोसले व पोलीस अधीक्षक मनोज पाटील यांनी नगर-औरंगाबाद रस्त्यावरील सिटी लॉन्स, आशीर्वाद लॉन्स व ताज लॉन्सला अचानक भेट देऊन पाहाणी केली.
लग्नसोहळ्यासाठी तिथे उपस्थित असलेल्यांपैकी बहुतेकांच्या तोंडाला मास्क नसल्याचे आढळून आले. वधू-वराचे नातेवाईकही नियमांची पायमल्ली करीत असल्याचे दिसून आले. त्यामुळे जिल्हाधिकारी व पोलीस अधीक्षकांनी वर्हाडी मंडळींची चांगलीच झाडाझडती घेतली. मंगल कार्यालय मालकांवर पाच हजार रुपयांची दंडात्मक कारवाई केली. करोना प्रतिबंधक नियमावलीचे काटेकोरपणे पालन करण्याच्या सूचना दिल्या.
दरम्यान, जिल्हाधिकारी राजेंद्र भोसले व पोलीस अधीक्षक मनोज पाटील यांनी अहमदनगर महाविद्यालयात भेट देऊन पाहाणी केली. विनामास्क फिरणार्या विद्यार्थ्यांवर दंडात्मक कारवाई केली.
10 हजारांचा दंड होणार
मंगल कार्यालयात 50 पेक्षा जास्त गर्दी आढळून आल्याने जिल्हाधिकारी व पोलीस अधीक्षकांच्या पथकाने मंगलकार्यालयांवर दंडात्मक कारवाई केली. यापुढे मंगल कार्यालयात 50 पेक्षा जास्त लोकांची गर्दी आढळून आल्यास त्यांना 10 हजारांचा दंड करून मंगल कार्यालय सील करण्यात येईल, अशी माहिती सूत्रांनी दिली.
करोनाचा प्रादुर्भाव रोखण्यासाठी लोकांनी नियमांचे पालन करणे बंधनकारक आहे. मास्क, शारीरिक अंतर, आदी नियमांचे पालन न करणार्यांविरुद्ध कडक कारवाईची मोहीम सुरु करण्यात आली आहे. नागरिकांची काळजी घ्यावी.
विशाल ढुमे,
पोलीस उपाधीक्षक, नगर शहर
डिजिटल प्रभात आता टेलिग्रामवर! चॅनल जॉईन करा व मिळवा सर्व महत्वपूर्ण अपडेट्स, चॅनल जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा