मोदी सरकारच्या आडमुठेपणामुळे इंधन दरवाढ – पृथ्वीराज चव्हाण

सातारा  – मोदी सरकारच्या हटवादी धोरणामुळे इंधनाची भरमसाठ दरवाढ झाली आहे. इंधनावर लादलेला कर कमी केला तरी दर कमी होणे शक्‍य आहे. मोदींनी एका हाताने दिले आणि दहा हातांनी लोकांकडून काढून घेतले आहे, अशी टीका माजी मुख्यमंत्री, आ. पृथ्वीराज चव्हाण यांनी शुक्रवारी केली.

सातारा येथे जिल्हा कॉंग्रेस कमिटीत नवनियुक्त पदाधिकाऱ्यांच्या सत्कारानंतर झालेल्या पत्रकार परिषदेत ते बोलत होते. जिल्हाध्यक्ष डॉ. सुरेश जाधव, महिला आघाडीच्या धनश्री महाडिक, युवकचे जिल्हाध्यक्ष विराज शिंदे, जिल्हा परिषद सदस्य ऍड. उदयसिंह पाटील-उंडाळकर उपस्थित होते.

आ. चव्हाण म्हणाले, करोना लसीकरण, किसान सन्मान योजना, गॅसचे मोफत वाटप या योजना राबविण्यात आल्याचे मोदी सांगत असले, तरी सरकारच्या तिजोरीतून वाटलेल्या पैशांपेक्षा कितीतरी जास्त पैसे मोदींनी लोकांच्या खिशातून काढून घेतले आहेत.

इंधन दरवाढ करून लोकांवर बोजा टाकण्यात आला आहे. पाकिस्तानात 51 रुपयांना एक लिटर पेट्रोल मिळते. आपल्याकडे आर्थिक तूट भरुन काढण्यासाठी इंधनावर भरमसाठ कर लादण्यात आले आहेत. ते कमी करण्याचा निर्णय मोदींनी प्रथम घ्यावा.

मागील सरकारच्या चुकीच्या आयात धोरणांमुळे इंधन दरवाढ झाल्याचा आरोप मोदींनी केला आहे. त्याबाबत विचारले असता, आम्ही त्यावर खुली चर्चा करायला तयार आहोत. देशात 85 टक्के तेल आयात केले जाते. कॉंग्रेसने जे केले, ते आम्ही खुलेपणाने मांडले आहे, असे त्यांनी स्पष्ट केले.

मुंबईचे महत्व कमी करण्यासाठी महत्त्वाची कार्यालये व कंपन्या गुजरातला नेण्यात येत आहेत. हे सगळे घडत असताना, केवळ मोदींना विरोध नको, म्हणून माजी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस हे सर्व शांतपणे पाहत असल्याची टीका आ. चव्हाण यांनी केली.

डिजिटल प्रभात आता टेलिग्रामवर! चॅनल जॉईन करा व मिळवा सर्व महत्वपूर्ण अपडेट्स, चॅनल जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा

Leave A Reply

Your email address will not be published.