पुणे – शहराची दुसरी लोकसभा निवडणूक १९५७ मध्ये झाली. या काळात संयुक्त महाराष्ट्राची चळवळीची लाट होती. महाराष्ट्र हे स्वतंत्र राज्य करताना मुंबई गुजरातला जोडण्याच्या हालचाली सुरू होत्या. मुंबईसह स्वतंत्र महाराष्ट्र राज्य व्हावे, या मागणीसाठी संयुक्त महाराष्ट्राची चळवळीच्या लाटेत पुण्यात दुसऱ्याच लोकसभेत प्रजा समाजवादी पक्षाने पुण्याच्या लोकसभा काॅंग्रेसचा पराभव करत ताब्यात घेतली.
प्रजा समाजवादी पक्षाच्या नानासाहेब गोरे यांनी पुण्याचे काॅंग्रेसचे पहिले खासदार काकासाहेब गाडगीळांना पराभूत केले. मात्र, या निवडणुकीसाठी पूना सेंट्रल आणि पूना साऊथ हे दोन मतदरसंघ एकत्र करत “पूना’ हा स्वतंत्र मतदारसंघ करण्यात आला. तर बारामती लोकसभा मतदारसंघाची निर्मितीही करण्यात आली. १९५७ च्या लोकसभा निवडणुकीत पुण्यात ३ लाख ५७ हजार २४७ मतदार होते. त्यातील २ लाख ४३ हजार ८०४ (६८.४ टक्के ) मतदरांनी मतदानाचा हक्क बजावला. त्यात गोरे यांना १ लाख ४३ हजार ८२२ तर काकासाहेब गाडगीळ यांना ९९ हजार ५८६ मते मिळाली.
केशवराज जेधे बारामतीतून विजयी
१९५१ च्या पहिल्या लोकसभा निवडणुकीत पूना सेंट्रल मतदारसंघातून काकासाहेब गाडगीळांनी पराभव केलेले शेतकरी कामगार पक्षाचे नेते केशवराव जेधे यांनी काॅंग्रेसच्या तिकिटावर १९५७ मध्ये बारामती लोकसभा मतदारसंघातून विजय मिळविला. हा मतदारसंघ नव्याने तयार करण्यात आला होता.
या मतदारसंघात एकूण ३ लाख ३४ हजार ७३४ मतदार होते. त्यातील १ लाख ४७ हजार ७२६ ( ४४.१३ टक्के ) मतदारांनी मतदानाचा हक्क बजावला. त्यात जेधे यांना ६३ हजार ३६४ मते मिळाली. तर आबासाहेब शितोळे हे अपक्ष उमेदवार होते. त्यांना ४५ हजार तर २०० तर आणखी एक अपक्ष उमेदवार मालतीबाई तेंडूलकर यांंना ३९ हजार १६२ मते मिळाली.