नवी दिल्ली – पंतप्रधान नरेंद्र मोदी दिनांक 19 मे पासून जपान, ऑस्ट्रेलिया आणि पापुआ न्यू गिनियाच्या दौऱ्यावर जाणार आहेत. या दौऱ्यादरम्यान ते जपानमध्ये “जी-7’परिषदेत आणि ऑस्ट्रेलियामध्ये होणाऱ्या “वॉड’ गटाच्या बैठकीला उपस्थित राहणार आहेत.
हिरोशिमा येथे होणाऱ्या “जी-7′ गटाच्या परिषदेला जपानचे पंतप्रधान फुमिओ किशिदा यांच्या निमंत्रणावरून पंतप्रधान उपस्थित राहणार आहेत. या परिषदेत मोदी शांतता, स्थैर्य आणि समृद्धतेच्या मुद्यावर भाष्य करणार आहेत. अन्न, खते आणि उर्जा सुरक्षितता, आरोग्य लैंगिक समानता, वातावरण बदल आणि पर्यावरण, पायाभूत सुविधा आणि विकासासाठीच्या सहकार्याच्या मुद्यावरही ते आपली मते मांडणार आहेत.
या परिषदेच्या निमित्ताने तेथे उपस्थित असलेल्या काही आंतरराष्ट्रीय नेत्यांशी ते द्विपक्षीय चर्चाही करणार आहेत. जपानवरून मोदी पापुआ न्यू गिनिआची राजधानी पोर्ट मोरेस्बी येथे जाणार आहेत. तेथे पापुआ न्यू गिनिआचे पंतप्रधान जेम्स मरापे यांच्यासमवेत “इंडिया पॅसिफिक आयलंडस कोऑपरेशन’च्या तिसऱ्या सत्राला ते उपस्थित राहणार आहेत.
पापुआ न्यू गिनिआला मोदींची ही पहिलीच भेट असणार आहे. “इंडिया पॅसिफिक आयलंडस कोऑपरेशन’मध्ये भारतासह फिजी, पापुआ न्यू गिनी, टोंगा, तुवालू, किरिबाती, सामोआ, वानुआतु, नियू, मायक्रोनेशियाची संघराज्ये, मार्शल बेटांचे प्रजासत्ताक, कुक बेटे, पलाऊ, नौरू आणि सॉलोमन बेटांचा समावेश आहे.
आपल्या दौऱ्याच्या अखेरच्याटप्प्यात मोदी ऑस्ट्रेलियाला जाणार आहेत. तेथे ते “क्वॉड’गटांच्या देशांच्या बैठकीला उपस्थित असणार आहेत. अमेरिकेचे अध्यक्ष ज्यो बायडेन, डपानचे पंतप्रदान फुमिओ किशिदा आणि ऑस्ट्रेलियाचे पंतप्रधान ऍन्थनी अल्बानीज हे देखील या बैठकीला उपस्थित असणार आहेत.