केपटाऊन : भारत-दक्षिण आफ्रिका यांच्यातील तीन सामन्यांच्या कसोटी मालिकेत तिसरा आणि निर्णायक सामना मंगळवारपासून (11 जानेवारी) सुरु होत आहे. हा सामना केपटाऊनमधील न्यूलँड्स क्रिकेट मैदानावर खेळवणला जाणार आहे. या सामन्यानिमित्त या मैदानावरील काही खास आकडेवारी या लेखातून जाणून घेणार आहोत.
संघाची सर्वोच्च धावसंख्या
दक्षिण आफ्रिकेने मार्च 2009 मध्ये ऑस्ट्रेलियाविरुद्ध केलेल्या 651 धावा हा न्यूलँड्स क्रिकेट मैदानावरील सर्वोच्च कसोटी धावसंख्या आहे. एबी डिव्हिलियर्स (163), अश्वेल प्रिन्स (150) आणि जॅक कॅलिस (102) यांच्या शतकांच्या जोरावर तिसर्या आणि शेवटच्या कसोटीत दक्षिण आफ्रिकेने एक डाव आणि 20 धावांनी ऑस्ट्रेलियावर विजय मिळवला. मात्र, त्यांना तीन सामन्यांच्या कसोटी मालिकेत 2-1 ने पराभव पत्करावा लागला.
संघाची सर्वात कमी धावसंख्या
1899 मध्ये इंग्लंडविरुद्ध दक्षिण आफ्रिकेची 35 धावा ही न्यूलँड्स क्रिकेट मैदानावरील सर्वात कमी कसोटी धावसंख्या आहे. 246 धावांच्या लक्ष्याचा पाठलाग करताना आफ्रिकेचा संघ 22.4 षटकांतच गारद झाला. सलामीवीर अल्बर्ट पॉवेल हा एकमेव खेळाडू होता ज्यांना दुहेरी अंकात (11 धावा) धावा केल्या.
सर्वाधिक धावा करणारा फलंदाज
दक्षिण आफ्रिकेचा महान अष्टपैलू खेळाडू जॅक कॅलिसने न्यूलँड्स क्रिकेट मैदानावर 22 कसोटी सामन्यांमध्ये 72.70 च्या सरासरीने 2181 धावा केल्या आहेत. विशेष म्हणजे कॅलिसने याच मैदानावर (224 वि. श्रीलंका, 2012) कसोटीतील सर्वोच्च धावसंख्या नोंदवली.
एका डावात सर्वाधिक धावा
न्यूझीलंडचा माजी कर्णधार स्टीफन फ्लेमिंगची 2006 मध्ये दक्षिण आफ्रिकेविरुद्धची 262 ही न्यूलँड्स क्रिकेट मैदानावर फलंदाजाची सर्वोच्च वैयक्तिक धावसंख्या आहे. या खेळी दरम्यान न्यूझीलंडच्या कर्णधाराने 31 चौकार आणि दोन षटकार ठोकले.
सर्वाधिक बळी
डेल स्टेन हा न्यूलँड्स क्रिकेट मैदानावर सर्वाधिक कसोटी बळी घेणारा गोलंदाज आहे, त्याने 15 सामन्यांमध्ये 74 बळी घेतले आहेत. या वेगवान गोलंदाजाने येथे कसोटी सामन्यांमध्ये गोलंदाजी केलेल्या प्रत्येक 22व्या चेंडूवर सरासरी एक बळी मिळवला आहे.
एका सामन्यात सर्वाधिक बळी
1889 मध्ये दक्षिण आफ्रिकेविरुद्ध इंग्लंडच्या जॉनी ब्रिग्ज यांनी दोन्ही डावात मिळून तब्बल 15 फलंदाजांची शिकार केली. त्यांनी दक्षिण आफ्रिकेच्या पहिल्या डावात 17 धावा देत 7 फलंदाज बाद केले तर दुसर्या डावात ब्रिग्ज यांनी 11 धावा देत दक्षिण आफ्रिकेच्या 8 फलंदाजांना तंबुत धाडले.