पॅरिस -सर्बियाचा अव्वल मानांकित टेनिसपटू नोवाक जोकोविचने फ्रेंच ओपन ग्रॅंडस्लॅम टेनिस स्पर्धेच्या तिसऱ्या फेरीत धडाक्यात प्रवेश केला. त्याच्यासह आंद्रे रुब्लेव, कार्लोस अल्कराझ यांनी पुरुष एकेरीत आगेकूच केली. महिलांच्या एकेरीत एलिना एव्हानसेन, आर्यना सबालेन्का, दारिया कस्तकिना व युलिया पुतिनसेवा यांनीही आपापले सामने सामने जिंकत तिसरी फेरी गाठली.
जोकोविच सध्या कोसोवोमध्ये सुरू असलेल्या घटनांवर भाष्य करत वादाच्या केंद्रस्थानी आहे. मात्र, त्याने या स्पर्धेत या वादांचा आपल्या खेळावर कोणताही परिणाम होऊ न देता हंगेरीच्या मार्टिन फुस्कोव्हीकचा 7-6, 6-0, 6-3 असा सरळ तीन सेटमध्ये पराभव केला. रशियाच्या आंद्रे रुब्लेवनेही तिसरी फेरी गाठताना यजमान फ्रान्सच्या कोरेंटीयन मोटेटवर 6-4, 6-2, 3-6, 6-3 असी चार सेटमध्ये मात केली. स्पेनच्या कार्लोस अल्कराझने जपानच्या ट्रायो डॅनियलचा 6-1, 3-6, 6-1, 6-2 असा पराभव केला.
महिलांच्या एकेरीत रशियाच्या एलिना एव्हानसेनने यजमान फ्रान्सच्या लिओलिया जेनेजेनवर 6-0, 7-5 अशी मात केली. बेलारूसच्या अव्वल मानांकित आर्यना सबालेन्काने आपलीच देश सहकारी खेळाडू इर्याना सायम्नोव्हीचचा 7-5, 6-2 असा पराभव केला. रशियाच्या दारिया कस्तकिनाने चेक प्रजासत्ताकच्या मार्केटा सिमकोव्हावर 6-3, 6-4 अशी मात केली. रशियाच्या युलिया पुतिनसेवाने चीनच्या झीन क्वीनवेनवर 6-3, 4-6, 6-2 असा विजय मिळवला.